पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळी बहुजन समाज पक्षातर्फे निवडणूक लढवलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी आगामी लोकसभेसाठी ‘आप’चा मार्ग स्वीकारला असून त्यांनी ‘आप’कडे उमेदवारी मागितली आहे.
लोकसभेची निवडणूक बसपमधून लढवण्याचा निर्णय घेत कुलकर्णी यांनी २००९ साली काँग्रेसचे सुरेश कलमाडी, भाजप-शिवसेना युतीचे अनिल शिरोळे आणि मनसेचे रणजित शिरोळे यांना पुण्यात लढत दिली होती. त्या निवडणुकीत त्यांना ६२ हजार ९११ मते मिळाली होती आणि ते चौथ्या क्रमांकावर गेले होते. बसपाच्या मायावती यांना उत्तर प्रदेशात मिळालेले यश आणि त्यावेळी यशस्वी ठरलेली त्यांची ‘सोशल इंजिनियरिंग’ची कल्पना या पाश्र्वभूमीवर डीएसके पुण्याच्या रिंगणात उतरले होते. मात्र, पुण्यात बसपला यश मिळाले नाही.
बदललेल्या परिस्थितीत दिल्लीत आम आदमी पक्षाकडून झालेल्या सत्तापरिवर्तनाच्या पाश्र्वभूमीवर आता डीएसके यांनी ‘आप’मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेसाठी ‘आप’मधून ज्यांना उमेदवारी हवी आहे त्यांनी त्यांचे अर्ज ई मेलद्वारे पक्षाकडे करायचे आहेत. तशी पद्धत पक्षाने इच्छुकांसाठी निश्चित करून दिली आहे. त्यानुसार डी. एस. कुलकर्णी यांनी पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठीचा अर्ज पक्षाकडे ई मेलद्वारे केला आहे. लोकसभा निवडणुकांचा विषय सुरू झाल्यानंतर डीएसके यावेळची निवडणूक पुन्हा बसपकडून लढणार का अन्य एखाद्या राजकीय पक्षाचा पर्याय निवडणार अशी चर्चा गेले काही दिवस होती. त्याबाबत चौकशी केली असता ‘आप’कडे अर्ज केल्याचे कुलकर्णी यांनी सोमवारी सांगितले.