पिंपरी : आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यावरील निलंबनाची कारवाई पक्षाने रद्द केली आहे. याबाबतची माहिती आपचे राज्य प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी दिली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील ‘आप’चे अधिकृत उमेदवार मनोहर पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा ठपका ठेवत चेतन बेंद्रे यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. बेंद्रे गेली दहा वर्षे ‘आप’मध्ये कार्यरत आहेत. शहरातील विविध नागरी समस्या, श्रमिक जनतेचे प्रश्न, विविध पातळीवर त्यांनी लोकाभिमुख आंदोलने केली आहेत. आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यालयातून विविध नागरी सुविधा, शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम गेली काही वर्षे ते निगडी, आकुर्डी भागात करत आहेत. पक्षासाठी केलेल्या कामाचा विचार करत बेंद्रे यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे.

हेही वाचा – मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘सीआयएसएफ’च्या जवानांचा पहारा

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निम्मे जलतरण तलाव बंदच!

राज्य समितीने कारवाईचा फेरविचार केला. माझ्याकडून कोणतीही चूक झाली नव्हती. दहा वर्षांपासून मी निष्ठेने पक्षाचे काम करत होतो. यापुढेही पक्षाचे काम करत राहील, अशी प्रतिक्रिया बेंद्रे यांनी दिली.

Story img Loader