आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्य़ातील चारही मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी आम आदमी पक्षाने ठेवली असून पुण्यातून सुभाष वारे यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. तर, अन्य तीन मतदारसंघात चाचपणी सुरू असल्याची माहिती ‘आप’चे समन्वयक मारूती भापकर यांनी दिली. पक्षाने आदेश दिल्यास आपण मावळ लोकसभा लढू, अशी तयारीही भापकरांनी दर्शवली.
राज्यभरात आप आणि राष्ट्रवादीत संघर्षांचे वातावरण आहे. पुणे जिल्हा हा तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, तेथे राष्ट्रवादीशी दोन हात करण्याची तयारी आपने ठेवली आहे. बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघात आपचे उमेदवार रिंगणात उतरणार असून त्यादृष्टीने जाहीर सभा घेण्यात आल्या व त्यापैकी बारामतीतील शारदा प्रांगणात झालेली सभा सर्वात मोठी ठरल्याचे भापकर यांनी सांगितले. पुण्यातून सुभाष वारे निवडणूक लढणार असून अन्य मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मावळसाठी जलचळवळीतील नेत्या उल्का महाजन व सुरेखा दळवी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांनी नकार कळवला आहे. तथापि, निवडणुकीत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाने आदेश दिल्यास आपण मावळमधून लढू शकतो. शिरूरसाठी रवी धनप, अॅड. रेगे, निवृत्त न्यायाधीश निकम अशी नावे चर्चेत आहेत. चारही मतदारसंघात लढू , मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे भापकर यांनी म्हटले आहे.
जिल्ह्य़ात विधानसभेचे २१ मतदारसंघ आहेत. तिथे पक्षबांधणीचे काम सुरू आहे. विधानसभानिहाय तसेच शहरपातळीवरही प्रभागनिहाय समित्या होत आहेत. ग्रामीण भागात बुथ कमिटय़ांपर्यंत जाण्याचे नियोजन आहे. १० ते २६ जानेवारी दरम्यान झालेल्या सदस्यनोंदणी अभियानात ६५ हजार इतकी नोंदणी झाली आहे. शुध्द चारित्र्याची माणसे राजकारणात यावीत, राजकारणातील गढूळपणा व गुन्हेगारी कमी व्हावी, हाच ‘आप’चा उद्देश असून कृतीतून पर्याय देण्याचा विचार आहे. ‘मनी’, ‘मसल’ मुळे सामान्य माणूस निवडणुका लढू शकत नाही, असे सध्याचे चित्र आहे. ते बदलण्याचा आपचा प्रयत्न असल्याचे भापकर यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा