पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील आम आदमी पक्षाचे बहुतेक सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या मागे असून, दिल्लीत १४ एप्रिल रोजी होत असलेल्या परिषदेत ‘आप’चे मारुती भापकर यांच्यासह सर्व जण उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्थानिक सर्व जण यादव व भूषण यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आम आदमी पक्षातर्फे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मारुती भापकर, मानव कांबळे, इब्राहिम खान, कॅप्टन नारायण दास यांनी ही माहिती दिली. आम आदमी पक्षाने देशातील राजकारण भ्रष्टाचारविरहित व अधिक लोकसहभागाचे बनावे यासाठी जी स्वराज्य कल्पना मांडली, ती अधिक विकसित करण्यासाठी देशभरातील कार्यकर्ते व अभ्यासकांची एक स्वराज्य संवाद परिषद दिल्लीत आयोजित केली आहे. दिल्लीतील ही परिषद १४ एप्रिल रोजी होणार असून, या राष्ट्रीय परिषदेस योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, खासदार डॉ. धर्मवीर गांधी, आमदार पंकज पुष्कर, प्रो. आनंदकुमार, प्रो. अजित झा हे मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे भापकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील क्रियाशील व संवेदनशील कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टी अधिक बळकट करण्यासाठी अधिकाधिक संख्येने या परिषदेस उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे. पुणे व पिंपरीतील सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते दिल्लीला जाणार असल्यामुळे ते सर्व जण यादव यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा