या लेखाचा असा विचित्र वाटेल असा मथळा वाचून ‘ही कोणती भाषा’ असा प्रश्न अनेकांना पडेलही. ही भाषा मराठीच आहे आणि अनेक खवय्यांच्या मात्र फार फार परिचयाची आहे. नेमकी वर्ष सांगता येणार नाहीत, तरी पुण्यातील खवय्यांच्या किमान तीन पिढय़ांना ही भाषा अगदी सहज समजेल. त्यांनाच काय तुम्हालाही ही भाषा समजेल. फक्त त्यासाठी शनिवार पेठेतल्या ‘आप्पा’ला भेट द्यायला हवी. या आगळ्या वेगळ्या ठिकाणाला एकदा तुम्ही भेट दिलीत की मग हळूहळू ही ‘खिका’ची भाषा तुमच्याही अंगवळणी पडेल.

..तर ‘खिका’ म्हणजे साबुदाण्याची खिचडी आणि त्याच डिशमध्ये अध्र्या भागात दिली जाणारी काकडीची कोशिंबीर. या मिश्रणाचं नाव ‘खिका.’ ‘आप्पा’कडे गेल्यानंतर इतर काहीही खाल्लंत तरी ‘खिका’ घ्यायला विसरू नका. ‘आप्पा’ या नावापासूनच या हॉटेलचं वेगळपण लक्षात यायला लागतं. संग्राम देशमुख या मनानं उमद्या आणि उद्यमशील युवकानं हे हॉटेल सुरू केलं त्याला रविवारी (२८ ऑगस्ट) एक वर्ष पूर्ण होईल. पूना बोर्डिग या प्रख्यात भोजनगृहातला अनुभव संग्रामच्या पाठीशी आहे आणि ‘पूना बोर्डिग’च्या सुहास उडपीकरांचं मार्गदर्शनही त्याला आहे. डेक्कन जिमखान्यावर पीवायसी मैदानाला लागून ‘आप्पा कॅन्टीन’ नावाचं आप्पा भट यांचं एक छोटं हॉटेल होतं. गेल्यावर्षी ते बंद पडलं. त्या हॉटेलमधले तिघे-चौघे जण आता संग्रामने सुरू केलेल्या ‘आप्पा’मध्ये आहेत.

मटार उसळ-पाव, खिचडी-काकडी, इडली सांबार, उडीद वडा सांबार, बटाटावडा चटणी, साजूक तुपातला शिरा, उपीट, पोहे, मिसळ हे ‘आप्पा’मध्ये मिळणारे खास पदार्थ. अर्थात ते सगळे रोज मिळत नाहीत. सर्व पदार्थाचं एक शिस्तीचं वेळापत्रक आहे. रोज येणाऱ्यांना रोज वैविध्यपूर्ण चवीचं असं काही तरी मिळालं पाहिजे, या हेतूनं हे पदार्थ आलटून पालटून पुरवले जातात. सांबार हे ‘आप्पा’ची खासियत. ते दाक्षिणात्य थाटाचं असलं तरी उडपी हॉटेलमध्ये मिळणारं सांबार आणि हे सांबार यात खूपच फरक आहे. मुख्य म्हणजे इथे इडली सांबार या डिशसाठी मिळणारं सांबार वेगळं असतं. ते चिंच गूळ वापरून केलेलं किंचितसं आंबट-गोड सांबार, तर उडीद वडा सांबारसाठी खास तिखट चवीचं सांबार इथे दिलं जातं. असाच प्रकार मिसळीबाबतही आहे. मिसळीच्या सँपलचा मसाला संग्रामला त्याच्या नाशिकच्या बहिणीनं दाखवला आणि त्या मसाल्यात तयार झालेलं सँपल खवय्यांच्या पसंतीला उतरलं. हाच मसाला मग पुण्यात तयार व्हायला लागला. अर्थात इथला प्रत्येकच पदार्थ चवीनं खाण्याचाच आहे. त्यामुळेच इथला साजूक तुपातला शिरा असेल, इडली सांबार बरोबर खाण्याची शेव असेल किंवा वेगळ्याच र्तीची चवीष्ट मटार उसळ असेल, बटाटा वा उडीद वडा असेल, फोडणी दिलेली चटणी असेल, भरपेट नाश्ता झाला की ताक असेल, शेंगदाण्याचा लाडू असेल.. या सर्वाची काही ना काही खासियत आहेच. हे सर्व पदार्थ चवीष्ट स्वरूपात देणं शक्य होतं ते मुख्यत: त्यांच्या मसाल्यांमुळे. सांबार असू दे, नाहीतर सँपल त्याचा मसाला बाहेरून खरेदी केला जात नाही. तर हॉटेलमध्येच हे मसाले तयार केले जातात.

कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्ही गेलात की काय घडतं? वेटर पाणी आणून टेबलवर ठेवतात. मग आपण ऑर्डर देतो. ‘आप्पा’कडे गेल्यावर तुम्ही जरा बारकाईनं निरीक्षण केलंत, तर तुमच्या लक्षात येईल की इथे आलेले अनेक जण काही ऑर्डरच देत नाहीत. पण थोडय़ा वेळानंतर त्यांच्यासमोर डिश मात्र आलेली असते. ‘आप्पा’कडे येणारे हे वर्षांनुवर्षांचे ग्राहक. त्यांनी काय खायचं हे काशिनाथ गोवाळीकर, संदीप साने, दीपक कासेकर ही ‘आप्पा’कडे काम करणारी मंडळी ठरवतात. या जुन्या मंडळींना काय आवडतं आणि त्यांना केव्हा काय द्यायचं हे या तिघांना पक्कं माहिती आहे. आचारी मंडळी, कामगारवर्ग आणि खवय्ये ग्राहक यांच्यात असलेलं असं हे नातं. अशा या आगळ्या वेगळ्या ठिकाणी जायचं तर सकाळी आठ ते दुपारी एक, दुपारी तीन ते रात्री आठ आणि रविवारी सायंकाळी बंद हे वेळापत्रक लक्षात घ्या. अर्थात खवय्ये ते लक्षात घेतील यात शंकाच नाही.

आप्पाकुठे आहे..

शनिवार पेठेत कॉसमॉस बँकेजवळ, धोबी घाटासमोर

Story img Loader