पुणे : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी करून पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविल्यामुळे काँग्रेसमधून निलंबित केलेले माजी उपमहापौर आबा बागुल यांनी त्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे ‘आर्जव’ करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या ‘आर्जवा’ला पक्षश्रेष्ठी प्रतिसाद देणार का, याबाबत उत्सुकता आहे.
‘महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांना उभारी मिळाली. तसेच, काँग्रेस विचारधारेची मतपेढीही राखता आली. त्यामुळे कोणतेही पत्र न देता आणि म्हणणे ऐकून न घेता पक्षातून निलंबन केले असल्यास ते तातडीने मागे घ्यावे आणि काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असल्याचे पत्र द्यावे,’ अशी मागणी बागुल यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
हेही वाचा – पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
या संदर्भात आबा बागुल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रशासक आणि संघटक उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यासह राज्याचे निरीक्षक रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य नेत्यांना पत्र पाठवले आहे. पर्वती मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली १५ वर्षे आहे. मात्र, त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार सलग तीन वेळा मोठ्या मतांनी पराभूत झालेले आहेत.
हेही वाचा – ‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
ही सर्व परिस्थिती पक्षश्रेष्ठींकडे अनेक वेळा निदर्शनास आणून देताना पर्वती मतदारसंघ काँग्रेसने घ्यावा, अशी मागणीही केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या मतदारसंघात काँग्रेसचे मतदार जपले जावेत, यासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, असे बागुल यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या घटनेमधील तरतुदींचा कोणताही विचार न करता निलंबन करण्यात आले आहे. नैसर्गिक न्यायाला हे धरून नाही. माझे म्हणणे ऐकून घेतले नाही. लेखी किंवा तोंडी खुलासा करण्याची संधी मिळाली नाही. ‘काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध मी निवडणूक लढवली नाही. त्यामुळे शिस्तभंग झालेला नाही. त्यामुळे निलंबन मागे घ्यावे,’ अशी मागणी बागुल यांनी या पत्रात केली आहे.
© The Indian Express (P) Ltd