‘व्हायब्रंट गुजरात’च्या धर्तीवर राजस्थानचा सर्वागीण विकास करण्याची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षामध्येच आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या राजवटीला नागरिक कंटाळले असून त्यांना बदल हवा आहे. मात्र, बदल होईल यावर विसंबून न राहता राजस्थानी बांधवांनी नोव्हेंबरमध्ये येऊन मोठय़ा संख्येने मतदान करावे, असे आवाहन राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्ष वसुंधराराजे िशदे यांनी मंगळवारी केले. ‘मैं आपको पिले चावल देनेके लियेही आयी हूँ’, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील राजस्थान प्रवासी संघातर्फे माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे िशदे यांचा तलवार आणि चुनरी (ओढणी) प्रदान करून सत्कार करण्यात आला. खासदार देवजी पटेल, प्रवक्तया शायना एन. सी., मुंबई भाजप अध्यक्ष राज पुरोहित, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, नगरसेविका मेधा कुलकर्णी, उमा खापरे, राजस्थान प्रवासी संघाचे अध्यक्ष दलवीरसिंह चौहान यांच्यासह राजस्थानातील आमदार या प्रसंगी उपस्थित होते.
पुण्याशी माझे दोन प्रकारचे नाते आहे. पुण्यातील शिंदे छत्री म्हणजे आमच्या घराण्याचे पूर्वज महादजी िशदे यांची समाधी, हे माहेरचे नाते. राजस्थानी समाजातील ३६ जमातीच्या बांधवांनी ओढणी परिधान केली ते माझ्या सासरचे आहेत. गेल्या वेळी पुण्यामध्ये बांधवांना भेटण्यास येण्याचे राहून गेले. ही चूक आता सुधारली असून मुंबई, कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई, बंगळुरु येथील राजस्थानी बांधवांच्या भेटीला जाणार आहे, असे सांगून वसुंधराराजे िशदे म्हणाल्या, आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत पाणी, वीज, रस्ते देण्याचे वचन पूर्ण केले. गुजरात सरकारला ६०० कोटी रुपये देऊन नर्मदेचे पाणी राजस्थानसाठी घेण्यामध्ये यश मिळविले. विविध उद्योगांच्या माध्यमातून राज्यामध्ये १ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच वीज गायब झाली. गेहलोत सरकारच्या कार्यकालात हे उद्योग पुणे-मुंबईकडे वळाले. राजस्थानला आदर्श राज्य बनविण्यासाठी बांधवांनी मतदान करण्यासाठी मातृभूमीला यावे. नोव्हेंबरमध्ये जो विजय होईल तो केवळ भाजपचाच नसेल, तर विशाल राजस्थानी परिवाराचा असेल.