पुणे : नागपूर येथील समता सहकारी बँकेतील १४५ कोटी रुपयांच्या गैरव्यहार प्रकरणात गेले १७ वर्ष फरारी असलेल्या अमन हेमानी याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पुणे कार्यालयातील पथकाने अटक केली. दिल्लीतील एका तारांकित हॉटेलमधून हेमानीला ताब्यात घेण्यात आले.
नागपूर येथील समता सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, कर्जदार अमन हेमानी आणि राजश्री हेमानी यांनी १९९७ ते २००७ या कालावधीत संगनमत करून १४५ कोटी ६० लाख रुपयांचा अपहार केला होता. याप्रकरणी एकूण ५७ आरोपींविरुद्ध नागपूरमधील सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास नागपूर येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात येत आहे.
या गुन्ह्यातील फरार आरोपी अमन कमरेशभाई हेमानी (वय ५२) गुन्हा दाखल झाल्यापासून १७ वर्ष फरार होता. हेमानी नाव बदलून पुणे, मुंबई, नागपूर, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली येथे राहत होता. तो त्याचे राहण्याचे ठिकाण आणि संपर्क क्रमांक सातत्याने बदलत होता. अमन बँकेचा कर्जदार होता. त्याने समता बँकेकडे मालमत्ता तारण ठेवली नव्हती. कर्जाची परतफेड न करता बँकेतील व्यवस्थापक, तसेच कर्मचाऱ्यांशी संगमनत करून बँक खातेदारांची फसवणूक केली आहे. विशेष न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वॉरंट बजावले होते. वॉरंट बजाविल्यानंतर तो न्यायालयात हजर झाला नव्हता.
हेही वाचा…‘लाडक्या बहिणीं’ना तीन हजार, पुन्हा सत्तेत आल्यास मदत दुप्पट; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यांनी विशेष तपास पथक तयार केले होते. या पथकाला आरोपी अमन दिल्लीत वसंत कुंज भागातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याला दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला नागपूर येथील सीआयडी पथकाच्या ताब्यात देण्यात आले. सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे, पोलिस अधीक्षक वैशाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण भोसले, पोलिस कर्मचारी विकास कोळी, सुनील बनसोडे, प्रदीप चव्हाण यांनी ही कामगिरी केली.