|| अलिफिया खान
अंतिम वर्ष निकालाची विद्यापीठाकडून फेरतपासणी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन (प्रत्यक्ष) परीक्षेच्या निकालातील त्रुटी समोर आल्या आहेत. परीक्षा देऊनही १८ हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित किंवा शून्य गुण असे नमूद केले आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून आठ हजार विद्यार्थ्यांच्या निकालाची पुनर्तपासणी करण्यात येत असून दहा हजार ३३ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते, अशी माहिती विद्यापीठाने दिली.
विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. या परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. आता परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येत असताना निकालातील गोंधळ आणि चुका समोर येऊ लागल्या आहेत. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित असल्याचा शेरा, तसेच काही विषयांमध्ये शून्य गुण असणे असे प्रकार झाल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले,‘ निकालात त्रुटी असल्याच्या तक्रारी येऊ लागल्यावर विद्यापीठाने निकालाची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांचा निकाल स्वतंत्रपणे विचारात घेतला जाईल. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांचे डिजिटल पुरावे उपलब्ध आहेत. तेही विचारात घेतले जातील. दहा हजार ३३ विद्यार्थी परीक्षेला उपस्थितच नसल्याचे आढळून आले आहे.
तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
युवक क्रांती दलाच्या शिष्टमंडळाने कु लगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन निकालात त्रुटी असलेल्या ७०० विद्यार्थ्यांची यादीच दिली आहे. राज्य संघटक जांबुवंत मनोहर, पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे, अतिक शेख आदी या वेळी उपस्थित होते. तातडीने उपाययोजना न के ल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.