मनसे म्हणजे विहिरीतील बेडूक असून मुंबई-महाराष्ट्र हेच त्यांचे विश्व आहे. महाराष्ट्राबाहेर जाण्याची हिंमत त्यांच्यात नाही. लखनौ आणि आझमगड येथे त्यांनी पक्ष काढून दाखवावा, कार्यालयासाठी आपण जागा देऊ. घाबरता कशाला, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी पिंपरीत केली. भाजपने नरेंद्र मोदी यांचे नाव नेतृत्वासाठी पुढे आणावे, हीच काँग्रेसची सुप्त इच्छा आहे. तसे झाल्यास मुस्लीम मते आपल्याकडे वळतील, असे मतांचे राजकारण त्यामागे आहे, अशी टिपणीही त्यांनी केली.
समाजवादी पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन आझमींच्या हस्ते झाले, तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. आझमी म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी आपापसात भांडतात, लढतात आणि सत्तेचे लाडू एकत्रितपणे खातात. त्यांना राज्याची चिंता नाही. राज्याला मागे नेण्याचे काम त्यांनी केले आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचे आणि पोलिसांवर गृहखात्याचे नियंत्रण नाही. गृहमंत्री आर. आर. पाटील अपयशी गृहमंत्री आहेत. भाजप-शिवसेना-रिपाइं-मनसे यांची महायुती झाल्यास काँग्रेस व राष्ट्रवादीची सुट्टी होईल, त्यांची सत्तेची दुकाने बंद होतील, अशी भीती त्यांना आहे. रामदास आठवले आतापर्यंत ज्यांच्या विरोधात लढले, एका जागेच्या लोभासाठी त्यांनाच जाऊन मिळाले. त्यांनी वास्तवाचे भान ठेवावे. महाराष्ट्रात सपाकडून लोकसभेच्या दहा जागा लढवण्यात येणार असून त्यापैकी काही जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची दादागिरी आहे. आतापर्यंत पक्षाचे कार्यालय सुरू करू दिले जात नव्हते. मात्र, आता कार्यकर्त्यांनी हिंमत दाखवून ते काम केले आहे, या ठिकाणी पक्षाची ताकद वाढवू, असे ते म्हणाले.
मनसे बेडूक; आबा अपयशी गृहमंत्री – अबू आझमी
मनसे म्हणजे विहिरीतील बेडूक असून मुंबई-महाराष्ट्र हेच त्यांचे विश्व आहे. तर गुन्हेगारांवर पोलिसांचे आणि पोलिसांवर गृहखात्याचे नियंत्रण नाही. गृहमंत्री आर. आर. पाटील अपयशी गृहमंत्री आहेत. अशी टीका अबू आझमी यांनी केली.
First published on: 09-07-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abu azmi named mns as frog r r patil as failure home minister