औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्यावरून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. त्यात समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचं नुकतचं एक वादग्रस्त विधान समोर आलं आहे. औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. असं आझमींनी म्हटलं आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अबू आझमींच्या या विधानावरून आता संभाजीराजे छत्रपतींनी लोणावळ्यात प्रसार माध्यमांशी बोलताना टीका केली आहे.
“अबू आझमी महाराष्ट्रात का राहतोय, असल्या माणसाला पहिलं महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे, असं बोलायची याची हिंमत कशी काय होते? शिवाजी महाराजांनी मुघलशाहीला केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून बाहेर काढण्याच ठरवलं होतं आणि हे असे माणसं महाराष्ट्रात राहतात हे दुर्दैव आहे. महाराष्ष्ट्रातील नागरिकांनी त्यांना(अबू आझमीला) सांगायला हवं की तुला जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं, शाहू, फुले आंबेडकरांचं आणि सगळ्या संतांचं नाव घ्यायला पाहिजे, काय त्या औरंगजेबच नाव घेतोय.” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
…यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्रातील खासदारांनी आवाज उठवणं गरजेचं आहे –
तसेच, “सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्राचे हे संस्कार नाहीत. कायदा आणखी कडक करण्यासाठी संसदेमध्ये खासदारांनी आवाज उठवायला हवा, जेणेकरून असं धाडस कोणी करणार नाही. यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्रातील खासदारांनी आवाज उठवणं गरजेचं आहे.” असं म्हणत त्यांनी बलात्कार व हत्येच्या घटनेवर देखील प्रतिक्रिया दिली.
याशिवाय, लवकरात लवकर मंत्रीमंडळ स्थापन करा आणि राज्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावा, असंही त्यांनी यावेळी नव्या सरकारला उद्देशून म्हटलं.
नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी? –
औरंगाबादमध्ये अनेक लोकांचं नाव औरंगजेब असून रावसाहेब दानवे यांचा दावा खोटा असल्याचंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, “औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात आहे. त्यामुळे तुम्ही राम पुनियानी यांना भेटा, ते मुस्लीम नाहीत. पण त्यांना औरंगजेबबाबत विचारा, औरंगजेब चांगला मुसलमान होता, याची हजारो उदाहरणं त्यांच्याकडे आहेत. औरंगजेबने कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये लढाई केली नाही.”
“औरंगजेब वाईट नव्हता” अबू आझमी यांचं खळबळजनक विधान, म्हणाले…
“महाराष्ट्रात औरंगाबाद, अहमदनगर आणि उस्मानाबाद या तीन शहरांच्या नावात मुस्लीम नाव आहे. ही तीन नावं बदलल्याने जर महाराष्ट्रातील जनतेला नोकरी मिळणार असेल, येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार असतील, विकास होणार असेल तर मी नामकरणाचं स्वागत करेन” असंही आझमी म्हणाले.