लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : वाघोली परिसरात घरात एकटी असलेल्या मुलीशी डिलिव्हरी बॉयने अश्लील कृत्य केल्याची घटना घडली. अश्लील कृत्य करुन पसार झालेल्या डिलिव्हरी बॉयचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने वाघोली (लोणीकंद) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी डिलिव्हरी बॉयविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोली भागात पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय राहायला आहेत. पीडित मुलीची आई घरकाम करते. आई एका सोसायटीत घरकामाला गेली होती. तेव्हा डिलिव्हरी बॉय घराजवळ आला. आईच्या नावाने पार्सल आले असून, पार्सल द्यायचे आहे, असे त्याने मुलीला सांगितले. मुलीने आईच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा आईने त्याला १०० रुपये देण्यास सांगितले, तसेच पार्सल ताब्यात घे, असे तिला सांगितले. त्यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून तो घरात शिरला. त्याने मुलीला प्यायला पाणी दे, असे सांगितले. त्यानंतर घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने मुलीबरोबर अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली.
या घटनेमुळे मुलगी घाबरली. ती रडू लागली. तेव्हा मुलीला घाबरू नको, असे सांगून त्याने मुलीला १०० रुपये दिले. मुलीशी पुन्हा अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केला. त्यानंतर तिला धमकावून डिलिव्हरी बॉय घरातून पसार झाला. मुलीने तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती आईला दिली. पसार झालेल्या डिलिव्हरी बॉयचे वय अंदाजे २८ ते २० वर्ष असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd