पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांमार्फत रामायणामधील घटनेवर आधारित ‘जब वी मेट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. तर या नाटकातील संवादावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत, नाटकाचा प्रयोग उधळून लावला होता. या घटनेप्रकरणी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी चतुःश्रुंगी मंदिर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारपर्यंत अभविपकडून मोर्चा काढण्यात आला.
हेही वाचा – पुणे : आवक वाढल्याने बहुतांश फळभाज्यांच्या दरात घट
यावेळी अभाविपचे पश्चिम विभागाचे महामंत्री अनिल ठोंबरे म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपर्यंत अनेकवेळा चुकीच्या पद्धतीने कामकाज झाले. त्या विरोधात आम्ही नेहमीच आवाज उठविण्याच काम केले आहे. तर दोन दिवसांपूर्वी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांमार्फत प्रभू श्रीराम आणि सीता माता यांच्याबद्दल जे पात्र सादर करण्यात आले त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने संवाद साधला गेला. तर या प्रकरणी संबधित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही मोर्चा काढला आहे. या आंदोलनाची दखल विद्यापीठ प्रशासनाने न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.