शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांकडून दंड आकारणी करण्याच्या एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गुरुवारी आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी शुल्क न भरण्याबाबतचे कारण दिल्यास दंडाची रक्कम माफ करण्याबाबत सकारात्मक असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.
हेही वाचा >>>पुणे:सदनिकेचे कुलूप तोडून अडीच लाखांचा ऐवज चोरला
एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने उशिरा शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांवर दंड आकारणी करण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधात अभाविपने आंदोलन करून दंड रद्द करण्याची मागणी केली. या वेळी पुणे महानगरमंत्री शुभंकर बाचल, अमोल देशपांडे, तुषार काहुल, पवन तिनाटे आदी या वेळी उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलसचिव प्रशांत दवे म्हणाले, की उशिरा शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांची कारणे जाणून घेण्यासाठीचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या कारणांचे मूल्यमापन करून आवश्यकतेनुसार दंड माफ करण्याबाबत विद्यापीठ सकारात्मक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरलेले नाही त्यांच्याबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात येत आहे.