पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेली शुल्कवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) पैसा दान करो आंदोलन केले. कुलगुरूंना खोट्या नोटा देण्यात आल्या आणि शुल्कवाढ कमी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. विद्यापीठाकडून शैक्षणिक विभागातील बीबीए, एमकॉम, एमए आदी अभ्यासक्रमांचे शुल्क वाढवण्यात आले आहे. ही शुल्कवाढ अवाजवी आहे. अनेक विद्यार्थ्यांना हे शुल्क परवडणारे नाही. त्यामुळे शुल्कवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी आतापर्यंत विद्यापीठाला निवेदने देण्यात आली.
मात्र विद्यापीठाने प्रतिसाद प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे विद्यापीठाला शुल्कवाढीबाबत जागे करण्यासाठी पैसा दान करो आंदोलन केल्याची माहिती प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी दिली. या वेळी प्रसाद आठवले, रंगा महादेव, अमोल देशपांडे, हर्षवर्धन हारपूडे, शांभवी साने आदी उपस्थित होते. या आंदोलनानंतर कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी सायंकाळी सहा वाजता विद्यार्थी संघटनांशी चर्चा करून शुल्काबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.