डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नोकरभरतीच्या घोटाळ्यातील प्रकरणी उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्रा घेतलाय. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नियमबाह्य भरती तीन महिन्यापूर्वी केल्याप्रकरणी माने यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी शासकीय इमारतीमधील धनराज माने यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. मानेंना तात्काळ पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी आंदोलनामध्ये करण्यात आली.

या आंदोलनानंतर उच्च शिक्षण संचालक धनराज माने म्हणाले की, मराठवाडा नोकरभरतीबाबत ३ महिन्यापूर्वी विधानसभेत निलंबनाचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याबाबत कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार झालेला नाही. शासनाचे आदेश प्राप्त होताच त्याचे पालन केले जाईल, असे माने म्हणाले. ‘अभाविप’चे महाराष्ट्र प्रदेशमंत्री राम सातपुते म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नोकरभरतीमध्ये उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी नियमबाह्य भरती केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ३ महिन्यापूर्वी निलंबनाचे आदेश दिले. या आंदोलनाची दखल घेत २४ तासांत त्यांच्या निलंबनाची कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला.

‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांच्या कार्यालयात आंदोलनकर्त्यांकडून पोस्टर भिरकवण्यात आले. तसेच आतील काचेचा दरवाजा देखील तोडण्यात आला. यादरम्यान आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्येही वाद झाल्याचा प्रकार पाहावयास मिळाला. आता शिक्षणमंत्री विनोद तावडे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

Story img Loader