ज्ञानेश भुरे
पुणे : भारताला तिरंदाजी प्रकारात दोन जगज्जेते तिरंदाज देणाऱ्या साताऱ्यातील ‘दृष्टी तिरंदाजी अकादमी’च्या यशाची पताका जागतिक स्तरावर फडकली आहे. प्रतिकूल परिस्थितीत आदिती स्वामी आणि ओजस देवताळे या जगज्जेत्यांना घडविणाऱ्या अकादमीकडे शासनाची दृष्टी कधी वळणार, असा प्रश्न प्रशिक्षक प्रवीण सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना उपस्थित केला.
तिरंदाज म्हणून वाई येथे चंद्रकांत भिसे यांच्याकडे प्रशिक्षणाला सुरुवात करणाऱ्या प्रवीण यांनी घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे साताऱ्यातच राहणे पसंत केले. दिवसा रुग्णालयात साहाय्यक म्हणून काम आणि संध्याकाळी सराव असा प्रवीण यांचा दिनक्रम असायचा. त्यांनी राष्ट्रीय शालेय तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले होते. तिरंदाजीत कारकीर्द घडविण्याची इच्छा असलेल्या प्रवीण यांना सराव करताना पाहून इतरही मुले शिकण्याचा हट्ट धरू लागले. त्यांना शिकवता शिकवता आपल्यातील खेळाडू मागे पडला आणि प्रशिक्षक जागा झाला, असे प्रवीण सावंत म्हणाले. अकादमीच्या निर्मितीविषयी बोलताना प्रवीण म्हणाले, ‘‘माझी शिकण्याची आणि शिकवण्याची तळमळ बघून साताऱ्यात औषधाचे दुकान चालवणाऱ्या महेंद्र कदम यांनी उसाच्या शेताची एक एकर जागा देऊ केली. मर्यादित सुविधा आणि साधनांसह शेतातच अकादमीची सुरुवात केली. पत्नी आणि आई यांना दागिनेही गहाण टाकावे लागले. सुविधांसाठी अनेकदा जिल्हा परिषदेकडे अर्ज केले; पण अजूनही काही सुविधा मिळत नाही. पावसाळय़ाच्या कालावधीतही चिखलात मुले सराव करतात. आदितीनेदेखील केला; पण कधीही तक्रार केली नाही.’’
भविष्यातील नियोजनाविषयी बोलताना ३२ वर्षीय प्रवीण सावंत म्हणाले, ‘‘अकादमीसाठी नुसती जमीन असून चालत नाही. हक्काचे घर उभारताना भिंती आवश्यक असतात. प्रकाश व्यवस्था हवी. अकादमीत राहणाऱ्या मुलांसाठी निवास व्यवस्था असावी. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून तुटपुंज्या आर्थिक मदतीने या सुविधा निर्माण केल्या. मुलांना विश्वास वाटावा म्हणून मी स्वत: त्यांच्याबरोबर राहतो. अजूनही सुविधा आणि सरावाची साधने उपलब्ध करून द्यायची आहेत.’’ तिरंदाजीने मला स्थैर्य दिले. महाराष्ट्र पोलीसमध्ये नोकरी दिली. पोलीस दलाच्या सहकार्याने नोकरीबरोबर खेळावरही लक्ष केंद्रित करू शकलो. आज दोन जगज्जेते घडवले. भविष्यात आणखी जगज्जेते घडवायचे आहेत. आदिती आणि ओजसच्या कामगिरीने मलाही प्रेरणा मिळाली आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
‘त्या’ ५२ सेकंदांसाठी खेळा..
अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व मुलांमध्ये प्रवीणसर आनंदासाठी खेळण्याची ऊर्मी जागवतात. खेळात विजय-पराभव असतोच; पण कुणाला हरवण्यासाठी खेळू नका, तर जिंकण्यासाठी आणि त्यानंतर वाजणारी ५२ सेकंदांची राष्ट्रगीताची धुन ऐकण्यासाठी खेळा, ही शिकवण सरांनी शिष्यांना दिली आहे. ‘हे सर्व त्या ५२ सेकंदांसाठी’ ही सुवर्णपदकानंतर आदितीने दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. आदिती लहानपणापासून अकादमीत सराव करते. ओजस वर्षांपूर्वीच दाखल झाला. आता तोदेखील प्रवीण सरांच्या शैलीमध्ये रुळला आहे.
सराव करणारी मुले शेतकरी कुटुंबातील आहेत. जिल्हा परिषदेकडे अनेकदा अर्ज केले; पण फाइल सरकारच्या लाल फितीत अडकून पडली. आता आदिती आणि ओजसच्या जागतिक यशानंतर तरी शासनाचे माझ्या अकादमीकडे लक्ष वळेल, अशी आशा धरायला हरकत नाही. – प्रवीण सावंत, तिरंदाजी प्रशिक्षक