सात बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी २० हजारांची लाच घेणाऱ्या वडगाव मावळातील मंडल अधिकारी महिलेसह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. या प्रकरणी मंडल अधिकारी संगीता राजेंद्र शेरकर (वय ५४) आणि संभाजी लोहोर यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती. तक्रारदाराने मावळ तालुक्यातील भडवली गावात जमीन खरेदी केली होती.
जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर तक्रारदाराचे नाव लावण्यासाठी शेरकर यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचेची रक्कम संभाजी लोहोर याला देण्यास सांगण्यात आले होते. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर मावळ तालुक्यातील आढले बुद्रुक तलाठी कार्यालय परिसरात सापळा लावून तक्रारदाराकडून लाच घेताना लोहोर याला पकडण्यात आले. शेरकर यांच्यासाठी लाच स्वीकारल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करत आहेत.