पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या म्हाळुंगे-माण नगररचना योजनेला गती मिळाली आहे. या योजनेंतर्गत माण येथील एका खटल्याचा निकाल पीएमआरडीएच्या बाजूने लागल्याने तेथील काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अभियांत्रिकी विभागाला देण्यात आले आहेत.
पीएमआरडीएचे नवनियुक्त महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी म्हाळुंगे-माण नगररचना योजनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. महिवाल यांनी हिंजवडी ते मर्सिडीज बेंज कंपनी दर्शनालयपर्यंत होणाऱ्या ३६ मीटर रुंद रस्त्याची पाहणी केली. तसेच माण येथील विकास ठाकर यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने तेथील काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश एमआयडीसीच्या अभियांत्रिकी विभागाला दिले.
याशिवाय नगररचना योजनेतील १.६ कि.मी. लांब आणि २४ मीटर रुंद रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच शेतकरी जमीनधारकांना द्यावयाच्या अंतिम भूखंडाचे केलेले सीमांकन आणि लावलेले नामफलक याची देखील पाहणी केली. नगररचना योजनेतील उपस्थित काही शेतकऱ्यांशी देखील महिवाल यांनी चर्चा केली. नदीलगतच्या निळ्या रेषेद्वारे बाधित भूखंडाचे पुनर्वाटपासाठी प्रस्तावित पहिल्या फेरबदल रचना योजनेचा नकाशा प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
याबाबत काही सूचना, हरकती असल्यास ९ सप्टेंबरपर्यंत पीएमआरडीएच्या कार्यालयात समक्ष सादर करण्याचे आवाहन महिवाल यांनी केले आहे.
महानगर आयुक्त यांचे विशेष कार्य अधिकारी रामदास जगताप, महानगर नियोजनकार डी. एन. पवार, अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर, कार्यकारी अभियंता शीतल देशपांडे, उपमहानगर नियोजनकार गणेश चिल्लाळ, एमआयडीसीचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.