पुणे : शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गिकेअंतर्गत विविध कामांनी वेग घेतला असून भुयारी मार्गात रूळ टाकण्याचे तसेच विद्युत तारा आणि सिग्नल यंत्रणा बसविण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. मेट्रो सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या या कामांनी गती घेतल्याने येत्या काही दिवसांत भुयारी मेट्रोची प्रत्यक्ष चाचणी होणार आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गाची कामे प्रगतिपथावर आहेत. ही मार्गिका शिवाजीनगर स्थानकापर्यंत उन्नत असून तेथून स्वारगेटपर्यंतची मार्गिका भुयारी आहे. एकूण सहा किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गात शिवाजीनगर, जिल्हा सत्र न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी पाच स्थानके आहेत. भुयारी मेट्रो मार्गिकेसाठी दोन्ही बाजूने प्रत्येकी सहा-सहा किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता रूळ टाकणे, विद्युत तारा बसविणे, सिग्नल यंत्रणा उभारणे अशी कामे सुरू झाली आहेत.

दोन रूळामधील रुंदीनुसार काँक्रीटचे जोते (प्लिंथ) तयार करण्यात येत आहे. त्यावर अन्य तांत्रिक कामे होणार असून ५७ मीटर लांबीच्या रुळाचे तुकडे बोगद्यात पोहोचविले आहेत. शिवाजीनगर सत्र न्यायालय, रेंजहिल्स येथे एकाचवेळी या कामांना सुरुवात केली आहे. रूळ टाकण्याबरोबरच विद्युत तारा बसविणे, सिगग्ल यंत्रणा, टेलिकम्युनिकेशन यंत्रोसाठी केबल, ओएफसी केबल टाकण्याचे कामही वेगाने सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून देण्यात आली.

भुयारी मेट्रो मार्गातील रूळ, विद्युत तारा आणि सिग्नल यंत्रणांची कामे येत्या काही दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर भुयारी मार्गात मेट्रोची चाचणी घेतली जाईल.

– डॉ. ब्रिजेश दीक्षित, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक