चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एनडीए-मुळशी रस्त्यावरील उड्डाणपूल पाडण्यात येणार असल्याने या भागातील विविध प्रकारच्या सेवा वाहिन्या काढून घेण्याच्या कामाला गती मिळाली आहे. येत्या काही दिवसांत सेवा वाहिन्या स्थलांतरित केल्या जाणार आहेत. चांदणी चौक परिसरातील जुना पूल पाडून तेथे नवा पूल उभारण्यात येणार असून जुना पूल १२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत पाडला जाणार आहे.

त्यामुळे विविध प्रकारच्या सेवा वाहिन्या स्वखर्चाने काढाव्यात, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले होते. उड्डाणपुलाखाली असलेल्या पाणीपुरवठा, दूरध्वनी, विद्युती वाहिनी, ओएफसी केबल्स आदी सेवा वाहिन्या संबंधितांना स्वखर्चाने स्थलांतरित कराव्या लागणार आहेत. सेवा वाहिन्या स्थलांतरासाठी दहा सप्टेंबरपर्यंतची मुदत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : पुणे जिल्हा बँकेच्या कायम कर्मचाऱ्यांना ; सरसकट दहा टक्के पगारवाढ

बावधन परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या ४५० मिलीमीटर व्यासाच्या दोन जलवाहिन्या या परिसरात आहेत. या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी पुलाला समांतर असा लोखंडी पूल उभारला जाणार आहे. त्यावर नवी जलवाहिनी टाकली जाईल. त्यानंतर काही काळासाठी पाणीपुरवठा बंद करून मुख्य जलवाहिनीला ही नवी जलवाहिनी टाकली जाणार आहे.

Story img Loader