लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गंगाधाम चौक परिसरात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केले. दिवसा जड वाहनांना बंदीचे आदेश असताना या भागात सर्रास वाहतूक सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस, तसेच प्रशासनाने जड वाहनांवर कारवाई करावी, तसेच अपघात रोखण्यासाटी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली.

मार्केट यार्ड भागातील गंगाधाम रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. अपघातात दमयंती भूपेंद्र सोळंखी (वय ५९, रा. गंगाधाम रस्ता) यांचा मृत्यू झाला. अपघातात सोळंखी यांची दुचाकीस्वार सून प्रियंका (वय २२) जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी डंपरचालक अशोक महंतो (वय ३०), मदतनीस गणेश प्रकाश बांदल (वय ३६, दोघे रा. बावधन) यांना अटक करण्यात आली. साेळंखी दुचाकीवरुन बुधवारी दुपारी गंगाधाम रस्त्यावरील बिबवेवाडी अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोरून त्या दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्या वेळी पाठीमागून डंपरने दुचाकीला धडक दिली. अपघातात दमयंती यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार प्रियंका या जखमी झाल्या. डंपरची धडक एवढी जोरात होती की अपघातानंतरचे दृश्य पाहून नागरिक हेलावले. त्यानंतर नागरिकांनी डंपरचालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

आणखी वाचा-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ, तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील घटना

अपघातानंतर या भागातील संतप्त नागरिक बुधवारी रात्री मार्केट यार्ड पोलीस ठाण्यासमोर जमले. डंपरचालकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. या भागात दिवसा जड वाहनांना बंदी असताना वाहतूक सुरू असून, जड वाहनांवर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी सकाळी या भागातील नागरिक गंगाधाम चौकात जमले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे यांच्यासह या परिसरातील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. गंगाधाम चौकापासून आईमाता मंदिराकडे जाताना चढ आहे. या भागात गतीरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली. आंदोलनस्थळी पोलीस, तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सकाळी सात ते रात्री नऊ यावेळेत जड वाहनांवरील बंदी आहे. पोलिसांनी आदेश धुडकाविणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

आणखी वाचा-चिंचवड विधानसभेवरून शंकर जगताप आणि आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप समोरासमोर! दोघांनी चिंचवडवर केला दावा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून गंगाधाम चौकात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी अर्बन सेलचे नितीन कदम यांच्यासह परिसरातील नागरिक आंदोलनात सहभागी झाले.

आईमाता मंदिर ते पूना मर्चंट चेंबर दरम्यान पुलाची मागणी

आईमाता मंदीर ते पूना मर्चंट्स चेंबरच्या कार्यालयापयंत पूल करण्यात यावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली होती. आईमाता मंदिर ते गंगाधाम चौक रस्त्यावर गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे, तसेच या भागात मोट्या व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण विचारात घेऊन आईमाता मंदिर ते पूना मर्चंट्स चेंबर दरम्यान पूल हाेणे गरजेचे आहे, अशी मागणी दी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे अध्यक्ष, ज्येष्ठ व्यापारी वालचंद संचेती यांनी केली आहे.