मोटार अपघात न्यायाधिकरणाच्या प्रयत्नांमुळे ९३ खटल्यांमधील ८५ पक्षकारांना सव्वादहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित महा लोकअदालतमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वाहनचालकांच्या कुटुंबीयांना या नुकसान भरपाईमुळे दिलासा मिळाला.
मोटार अपघात न्यायाधिकरणापुढे २१० खटले निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी ९३ खटले निकाली काढण्यात यश प्राप्त झाले. त्यांना सव्वादहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली, अशी माहिती मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य आणि जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. माने यांनी दिली. मोटार अपघात न्यायाधिकरणापुढे खटले निकाली काढण्यासाठी तीन पॅनेलची नियुक्ती करण्यात आली होती. नुकसान भरपाईची ८५ प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर आठ खटले रद्दबातल ठरविण्यात आले.
अपघातामुळे अपंगत्व आलेल्या पक्षकारांकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून न्यायालयात दावा दाखल करण्यात येतो. पक्षकारांना अपंगत्वाचा दाखला मिळण्यास अडचणी येतात. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यामध्ये विलंब होतो. अपंगत्वाचा दाखला मिळण्यासाठी यापूर्वी मोटार अपघात न्यायाधिकरणाने दोनदा शिबिराचे आयाोजन केले होते. शहरातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञांनी या शिबिरामध्ये मार्गदर्शन केले. त्याचाही फायदा पक्षकारांना झाला, असे एस. व्ही. माने यांनी सांगितले.
दरम्यान, लोकअदालतीवर न्यायाधिकरणाकडे कार्यरत असलेल्या वकिलांनी बहिष्कार टाकला होता. आपण वकिलांची आणि बार असोसिएशनची भेट घेऊन त्यांचे मन वळविले. पक्षकारांना फटका बसू नये म्हणून प्रयत्न केल्याचेही माने यांनी सांगितले.
अपघातात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई
मोटार अपघात न्यायाधिकरणाच्या प्रयत्नांमुळे ९३ खटल्यांमधील ८५ पक्षकारांना सव्वादहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.
Written by दया ठोंबरे
First published on: 15-12-2015 at 03:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident cases compensation