रस्त्याने पायी जात असताना दुचाकीची धडक लागून खाली पडलेली विद्यार्थिनी पीएमपी बसखाली सापडल्याने तिचा मृत्यू झाला. कोथरूडच्या रामबाग कॉलनी येथे शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पीएमपी चालकास अटक केली असून दुचाकी चालक मात्र पळून गेला.
साईना सत्यजित दळी (वय १८, रा. वेद विहार, चांदणी चौक, मूळ-अलिबाग) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईना ही भारती विद्यापीठ येथे आर्किटेक्चरचे शिक्षण घेत आहे. शनिवारी ती परीक्षा देऊन पायी घरी येत होती. रामबाग कॉलनीजवळ साईकुंज सोसायटीसमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास तिला एका दुचाकीने धडक दिली. त्यामुळे ती रस्त्यावर पडल्यानंतर त्याच वेळी भरधाव येत असलेल्या पीएमपीच्या मागील चाकाखाली ती सापडली.
अपघातानंतर दुचाकीचालक घटनास्थळावरून पळून गेला. या अपघातात साईना गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, चारच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पीएमपी चालक दयानंद पंडित डांगे (वय २५, रा. कात्रज) याला अटक केली आहे. पोलीस घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासणार आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आर. बी. फड हे अधिक तपास करीत आहेत.
सायना ही मूळची अलिबागची राहणारी आहे. तिच्या वडिलांचा अलिबाग येथे मल्टपिं्लेक्सचा व्यवसाय आहे. त्यांना ती एकुलती एक मुलगी होती. शनिवारी तिचा अर्किटेक्चरचा शेवटचा पेपर देऊन घरी येणार होती. मात्र, तिचा मृत्यू झाला. सायनावर अलिबाग येथे रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुचाकीच्या धडकेने रस्त्यावर पडलेल्या विद्यार्थिनीचा बसखाली सापडून मृत्यू
रस्त्याने पायी जात असताना दुचाकीची धडक लागून खाली पडलेली विद्यार्थिनी पीएमपी बसखाली सापडल्याने तिचा मृत्यू झाला.
First published on: 06-04-2015 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident death girl student pmp driver