पाळण्यात झोपलेली चिमुरडी खाली पडू नये म्हणून तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाळण्याला बांधलेल्या ओढणीनेच अकरा महिन्याच्या मुलीचा जीव घेतला. पाळण्यात ओढणीचा फास बसल्याने या दुर्दैवी बालिकेचा मृत्यू झाला. चिखलीतील जाधववाडी येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. 
सौम्या महेश तळोले (रा. जाधववाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौम्याला सकाळी आंघोळ घातल्यानंतर तिच्या आईने पाळण्यात झोपविले. आई घरातील कामात व्यस्त असताना अचानक ती उठली, तर पाळण्यातून उसळी मारेल व पडेल, अशी भीती असल्याने पाळण्याच्या वरून ओढणी बांधण्यात आली होती.
सौम्याला पाळण्यात झोपविल्यानंतर आई व घरातील व्यक्ती आपापल्या कामात व्यग्र झाले. या दरम्यान सौम्या पाळण्यात खाली सरकली. तिच्या हालचालींमुळे पाळण्याला तिच्या भोवती बांधलेली ओढणी तिच्या गळ्यापाशी आल्याने तिला फास बसला. त्यात तिचा मृत्यू झाला. गळ्याभोवती फास लागून सौम्या पाळण्याला लटकलेल्या आवस्थेत तळोले कुटुंबीयांना आढळून आली. या प्रकाराने कुटुंबीयांना धक्काच बसला. तिला तातडीने रुग्णालयात हालविण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
पुढील महिन्यामध्ये सौम्याचा पहिला वाढदिवस होता. मात्र, त्यापूर्वीच तिचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेबाबत परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

Story img Loader