मकरसंक्रात अवघी आठवड्यावर आली असताना पतंगाच्या मांजामुळे होणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढू लागले आहे. पिंपरी-चिंचवड येथे दुचाकीवर असलेल्या चिमुरड्याच्या डोळ्याला मांजाने कापल्यामुळे गंभीर इजा झाली आहे. अवघ्या तीन वर्षांचा हमजा खान या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला आहे. हमजाच्या दोन्ही डोळ्यांना एकूण ३२ टाके पडले आहेत.
नायलॉन मांजा बंदीचा प्रस्ताव अन् कारवाई नाही
हमजाचे कुटुंब मूळ दिल्लीचे आहे. ते गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्याला आहेत. हमजा खान आपल्या काकांसोबत उद्यानात गेला होता. पहिल्यांदा हमजा आणि त्याचे काका सुखरूपपणे घरी आले. मात्र, घरी आल्यानंतर हमजा पुन्हा उद्यानात जायचा हट्ट धरून बसला. तो बराचवेळ रडत होता. त्यामुळे हमजाच्या काकांनी त्याला पुन्हा उद्यानात नेले. तेथून घरी परतत असताना रस्त्यावर लटकत असलेल्या मांजाने हमजाच्या दोन्ही डोळ्यांना दुखापत झाली. त्याच्या डोळ्यातून बराच रक्तस्त्राव झाला. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, त्याच्या डोळ्याला ३२ टाके पडले आहेत.