लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ भरधाव कंटेनरने मोटारीला धडक दिल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी झालेल्या या अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या महिला मुंबईच्या राहणाऱ्या आहेत.
सोमवारी सकाळी पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजकावर आदळला. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या समोरच्या मार्गिकेवरील पाच वाहनांना धडक देऊन कंटेनर उलटला. या मोटारींमधील बकुळ राऊत (४६) व तेजस्विनी राऊत (४५, दोघी रा. दादर, मुंबई) यांचा अपघातात मृत्यू झाला, तर नाभम सुरेशम द्विवेदी (३४, रा. उत्तर प्रदेश), अंजना गणपतराव लोकरे (७३) आशिष गणपतराव लोकरे (४५, दोघे रा. धाराशिव), आरती गडदे (६५), अस्मिता खटावकर (४०, दोघी रा. विलेपार्ले, मुंबई) असे पाच जण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनातील जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजुला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.