पुण्यातील नवले पूलावर थांबलेल्या क्रेनला ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत एकाच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज चौकापासून नवले ब्रीजच्या दिशेने भरधाव वेगाने MH 25 AJ 1005 या क्रमांकाचा ट्रक जात होता. त्यावेळी ट्रकचा ब्रेक झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं. तेव्हा गाडीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना नवले ब्रीजवर उभे असलेल्या MH 06 AL 4135 या क्रमांकाच्या क्रेनला जोरात धडक दिली. या घटनेमध्ये ट्रकमध्ये दोघेजण अडकल्याचं समोर आलं. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले.
हे ही वाचा… दिवाळीतील हवा अन् ध्वनिप्रदूषणावर नजर! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष
कटरच्या साहाय्याने ट्रकचा काही भाग कापण्यात आला, दोन जखमींना बाहेर काढण्यात आले. या दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता काही वेळत त्या दोघांपैकी एकाच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे नवले पूलावर काही वेळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती.