पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात ब्रेक निकामी झालेला ट्रकने क्रेनला धडक दिली. अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ट्रकमधील मदतनीस गंभीर जखमी झाला. सलीम मकबूल शेख (वय ५८, रा. उमरगा, जि. धाराशिव) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. अपघातात ट्रकमधील मदतनीस (क्लिनर) समीर आयुब मोमीन हा जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाह्यवळण मार्गावरुन कात्रजकडून नवले पुलाकडे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ट्रक निघाला होता. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रकचालक सलीम शेख यांनी ट्रक सेवा रस्त्यावर नेला. सेवा रस्त्यावर थांबलेल्या क्रेनवर ट्रक आदळला. गंभीर जखमी झालेल्या शेख यांचा जागीच मृत्यू झाला. मदतनीस समीर केबीनमध्ये अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. केबीनध्ये अडकलेले मदतनीस समीर यांची जवानांनी सुटका केली. अपघातानंतर काही वेळ सेवा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

हे ही वाचा… दिवाळीतील हवा अन् ध्वनिप्रदूषणावर नजर! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष

बाह्यवळण मार्गावर गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. अपघात रोखण्यासाठी पोलीस, महामार्ग प्राधिकरणाने या परिसरात वाहतूक विषयक उपाययोजना केल्या. बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरात तीव्र उतार आहे. तीव्र उतारावर अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन अपघाताच्या घटना घडतात. या भागात अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन तेथे अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, तसेच वेग कमी करण्यासाठी गतीरोधक पट्टिका (रम्बलिंग स्ट्रीप) बसविण्यात आल्या आहेत. वाहतूक विषयक उपाययोजनांमुळे गेल्या काही महिन्यांपासून नवले पूल परिसरात गंभीर स्वरुपाच्या अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.