पुणे : भरधाव पीएमपी बसने वाहनांना धडक दिल्याची घटना पौड रस्त्यावरील लोहिया जैन आयटी पार्कसमोर घडली. अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. बसच्या धडकेत मोटार, दुचाकी आणि रिक्षाचे नुकसान झाले. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा – मावळमध्ये खरंच भाजपचे पथक आले का? शहराध्यक्षांचे स्पष्टीकरण, म्हणाले…
पीएमपी बस पौड रस्त्यावरुन कोथरुडकडे निघाली होती. लोहिया जैन आयटी पार्कसमोर तीव्र उतार आहे. उतारावर पीएमपी बसचालकाचे नियंत्रण सुटले. बसने मोटारीला धडक दिली. त्यानंतर एका दुचाकीस्वारासह रिक्षाला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार मोतीराम शेखर गायकवाड (वय २९, रा. मुळशी) जखमी झाले. अपघातात सौरभ सुधीर शेंडे (वय ४६,रा. मुंबई) यांच्या मोटारीचे नुकसान झाले. याप्रकरणी पीएमपी बसचालक फारुख रशीद शेख (वय ४४, रा. धायरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करत आहेत.