चालकाचे नियंत्रण सुटलेली मोटार रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये मोटारीतील चार जण ठार झाले तर, दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजन पुणे येथील सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर काम करणारे आहेत. पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव मावळजवळील विनोदेवाडीजवळ रविवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.
अशोक के. बालकृष्णन (वय २४, रा. फातिमानगर), नागराज के. राव (वय २३, रा. विकासनगर, किवळे), चंद्रशेखर सुधाकर दुरतकर (वय २३, रा. चंदनगर, खराडी) आणि अरुण करुणाकरण नायर (वय २२, रा. केदारीनगर, वानवडी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, इनवॉश जुलीयन मारिया सुसारन आणि सुंदर शंकर रासकटला (वय २२, रा. दोघेही- वानवडी) हे जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीत एकूण सहा जण प्रवास करत होते. वडगाव मावळ जवळील विनोदेवाडी येथे चालक दुरतकर यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला गेली. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या कंटनेरवर जाऊन आदळली. मोटारीचा वेग एवढा होता की मोटारीने कंटेनरला धडक दिल्यानंतर ती काही फूट उंच उडून जमिनीवर जोरात आदळली. यामध्ये मोटारीचा चेंदामेंदा झाला. या अपघातामध्ये जागेवर चार व्यक्तींचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.