सासवडजवळील पानवडी घाटात गस्तीवरील मोटार नव्वद फूट खोल दरीत कोसळून तीन पोलिसांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री घडलेला हा अपघात रविवारी सकाळी उघडकीस आला. दवणेवाडी येथे राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कार्यक्रमाचा बंदोबस्त संपवून तिघेही जवळच्या मार्गाने गस्त घालत सासवड पोलीस ठाण्यात येत असताना हा अपघात झाला.
शशिकांत निवृत्ती राऊत (वय ५१, रा. भिगवण, ता. इंदापूर, सध्या उरळीकांचन), उल्हास अनंत मयेकर (वय ४८, रा. भेकराईनगर, हडपसर) आणि अविनाश तुकाराम ढोले (वय ५२, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) अशी मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे तिघेही सासवड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर दौरा करून राज्यमंत्री शिवतारे हे दवणेवाडी येथे एका कार्यक्रमास आले होते. या ठिकाणी हे पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर होते. या ठिकाणचा बंदोबस्त संपल्यानंतर तिघेही रात्री साडेअकराच्या सुमारास मोटारीने काळदरी-नारायणपूर पानवडी घाटमार्गाने सासवडला निघाले. सासवडला येण्यासाठी हा जवळचा रस्ता असून, या मार्गाने गस्त घालत ते येत होते. मात्र, पहाटेपर्यंत ते पोलीस ठाण्यात न पोहचल्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली. रात्री बारानंतर त्यांच्या मोटारीशी संपर्कही तुटला होता.
पानवडीतील काही तरुणांना घाटात एक मोटार दरीत कोसळल्याचे आढळून आले. संबंधित मोटार पोलिसांची असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. सासवड पोलीस आणि पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारीचे दरवाजे तोडून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
सासवड पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पुणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गिरीश बापट, शिवतारे, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रितेश कुमार यांच्या उपस्थितीत या कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यात आली. राऊत, मयेकर व ढोले यांना प्रत्येकी एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यातील ढोले यांच्या मुलीचा विवाह झाला असून मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.
दरम्यान, कर्तव्य बजावित असताना तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. अंत्यसंस्कारासाठी तातडीचे सानुग्रह अनुदान म्हणून बारा हजारांची मदत देण्यात येत असून खात्यामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिले.
संपर्क तुटला.. पण नेहमीची घटना म्हणून दुर्लक्ष
पुणे ग्रामीण पोलिसांची हद्द मोठी असून, त्यातील बराचसा भाग हा दुर्गम आहे. त्या ठिकाणी असलेल्या दऱ्या-खोऱ्यांमुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांशी कधी-कधी संपर्क सुद्धा होऊ शकत नाही. शनिवारी रात्री बंदोबस्त संपवून सासवडकडे निघालेल्या पोलिसांच्या मोटारीचाही रात्री अचानक संपर्क तुटला. मात्र, नेहमी प्रमाणेच दुर्गम भागामुळे संपर्क तुटला असावा, असे पोलिसांना वाटले. पण, पहाटेपर्यंत कर्मचाऱ्यांशी संपर्क न झाल्यामुळे त्यांचा शोध सुरू झाला. रात्री नव्वद फूट दरीत कोसळलेली मोटार सकाळ झाल्यानंतरच पोलिसांना सापडली.
मोटार दरीत कोसळून तीन पोलिसांचा मृत्यू
सासवडजवळील पानवडी घाटात गस्तीवरील मोटार नव्वद फूट खोल दरीत कोसळून तीन पोलिसांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री घडलेला हा अपघात रविवारी सकाळी उघडकीस आला.
First published on: 29-12-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident police death saswad