अॅपे रिक्षा आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन रिक्षाचालकासह तीनजण ठार झाले असून अन्य दोन प्रवासी जखमी झाले आहेत. वाकड येथील ‘वाय जंक्शन’ येथे बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.
रिक्षाचालक केतन कुंडलीक सरोदे (वय २७, रा. कुंजीर चाळ, रामनगर, रहाटणी), विजय अंबादास कसबे (वय ५५, रा. विजयनगर, काळेवाडी), संदीप महादेव घोडके (वय ३२, रा. डांगे चौक, थेरगाव) अशी अपघातात ठार झालेल्या इसमांची नावे आहेत. तर, मिलिंद जयवंत कदम, नागेश नानासाहेब तांबे हे दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाकड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र िशदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा शिवाजीनगरहून थेरगावच्या दिशेने येत होती, त्यात पाच प्रवासी होते. टेम्पो विरुद्ध दिशेने जात होता. वाकडच्या वाय जंक्शन येथे रिक्षा व टेम्पोची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा चोळामोळा झाला. त्यात रिक्षाचालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षातील अन्य दोनजण जखमी झाले आहेत. रिक्षातील प्रवासी याच भागातील रहिवासी आहेत. वेगवेगळ्या कामासाठी ते बाहेरगावी गेले होते. रात्री उशीर झाल्यामुळे बस मिळाली नाही म्हणून त्यांनी रिक्षाचा आधार घेतला. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

Story img Loader