जेजुरी येथे देवदर्शनासाठी आलेले एक कुटुंब नाझरे धरणाच्या जलाशयात स्नानासाठी गेले असताना मुले पाण्यात उतरली.. त्यातील एक मुलगा पाण्यात बुडू लागला.. हा प्रकार पाहून मुलाच्या काकाने पाण्यात उडी घेतली.. पाय गाळात रुतले असतानाही त्यांनी पुतण्याला वाचविले, पण अनेक प्रयत्न करूनही त्यांना मात्र कुणी वाचवू शकले नाही.. कुटुंबासमोरच पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. रविवारी सकाळी ही घटना घडली.
गिरीश किसन घेटे (वय ४८, रा. इगतपुरी, जि.नाशिक) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझरे धरणाच्या जलाशयात घेटे कुटुंब स्नानासाठी आले होते. त्यांची मुले पाण्यात खेळताना पुढे गेली. त्या वेळी हर्षल घेटे (वय १४) हा पाण्यात बुडू लागल्याचे पाहताच त्याचे काका गिरीश घेटे हे मदतीसाठी धावले. हर्षलला वाचवताना दोघेही पाण्यातील गाळात अडकले. त्यामुळे त्यांचे नातेवाईक मदतीसाठी ओरडू लागले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली.
गिरीश घेटे यांनी स्वत:ची पर्वा न करता हर्षलला वर ढकलल्याने त्याला पाण्याबाहेर काढण्यात यश आले. मात्र गिरीश यांचे पाय व शरीर अधिकच गाळात रुतल्याने त्यांना बाहेर काढणे कठीण झाले. दहा मिनिटांच्या प्रयत्नामध्ये त्यांना आधारासाठी त्यांच्या दिशेने बांबू, साडी टाकण्यात आली. परंतु दुर्दैवाने कोणताही आधार त्यांना वाचवू शकला नाही. या घटनेनंतर एक तासात तेथील कार्यकर्त्यांनी त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. गिरीश घेटे हे इगतपुरी (जि.नाशिक) येथील महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनीत सुपरवायझर म्हणून कामास होते. नाझरे धरणातील मोठय़ा प्रमाणावरील गाळ जेसीबीने काढल्यामुळे तेथील पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. या महिन्यातील या भागातील हा तिसरा मृत्यू आहे. 

Story img Loader