पुणे-मुंबई महामार्गाचा निगडी ते देहूरोड हा टप्पा गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकीस्वारांसाठी धोक्याचा मार्ग ठरतो आहे. या टप्प्यामध्ये महिन्याला तीन ते चार दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागत असल्याने हा भाग मृत्यूचा सापळा झाला आहे. अवजड वाहनांची मोठय़ा प्रमाणावर वाहतूक होत असताना अरुंद रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे बळी जात असल्याचे निदर्शनास येत आहे. लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पुणे-मुंबई महामार्गाने पुण्याकडून मुंबईकडे जाताना निगडी नाक्यापर्यंत प्रशस्त रस्ता आहे. दुसरीकडे कात्रज-देहूरोड रस्ता संपतो त्या ठिकाणापर्यंत म्हणजेच देहूरोड पोलीस ठाण्यापर्यंतही तितकाच प्रशस्त रस्ता आहे. दोन्ही बाजूने सहा पदरी रस्ते असताना मधल्या पट्टय़ामध्ये निगडी नाका ते देहूरोड हा महामार्गाचा टप्पा अत्यंत अरुंद आहे. पुणे, िपपरी-चिंचवड, नगर, औरंगाबाद या भागातून येणाऱ्या जड वाहनांना द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी किंवा जुन्या महामार्गाने मुंबईकडे जाण्यासाठी याच पट्टय़ातून जावे लागते. जड वाहनांकडून अलीकडच्या काळामध्ये द्रुतगती मार्गाचा वापर वाढला आहे. त्यामुळे या पट्टय़ातूनही जड वाहने जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबरीने मोटारी व दुचाकीस्वारांची संख्याही वाढलेली आहे.
तळेगाव, देहूरोड, कामशेत, वडगाव आदी भागातून िपपरी-चिंचवड किंवा पुण्याकडे नोकरी किंवा धंद्याच्या निमित्ताने दुचाकीवरून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या दुचाकीस्वारांनाही निगडी ते देहूरोड हा अरुंद रस्त्याचा टप्पा ओलांडावा लागतो. भरधाव मोटारी व जड वाहनांच्या स्पर्धेमध्ये या टप्प्यातून जाताना दुचाकीस्वारांची अक्षरश: कसोटी लागते. समोरून येणारी व ओलांडून जाणारी वाहने दुचाकीस्वाराला दुर्लक्षितच करतात. त्यामुळे ट्रक किंवा डंपरचा धक्का लागून दुचाकीस्वाराचा अपघात होतो. दुसऱ्या वाहनाला ओलांडून समोरून आलेल्या वाहनामुळे कधी-कधी दुचाकीस्वाराला दुचाकी रस्त्याच्या खाली घ्यावी लागते. त्यात दुचाकी घसरण्याचीही शक्यता असते. बुधवारी एका युवकाचा दुचाकी घसरल्यानंतर कंटेनर अंगावरून गेल्याने या रस्त्यावर मृत्यू झाला. महिन्यात या रस्त्यावर तीन ते चार दुचाकीस्वारांचे बळी जात आहेत.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणारा हा रस्ता लष्कराच्या ताब्यात आहे. रस्त्याच्या दुतर्फा रुंदीकरण करण्यासारखी जागाही उपलब्ध आहे. प्रशासनाने तातडीने लष्कराशी चर्चा करून या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा