पिंपरी- चिंचवड मधील पिंपळे गुरव येथे भरधाव दुचाकीवर फोनवर बोलणं चालकाच्या जीवावर बेतलं आहे. या घटनेत स्कुलबसच्या चाकाखाली येऊन तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास पिंपळे गुरवच्या काटे पुरम बॅडमिंटन हॉल च्या समोर घडला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शैलेश गजानन जगताप (वय- २९) रा. पिंपळे गुरव अस अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा- पुणे: झाडावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; मुंढवा भागात अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश जगताप हा दुचाकीवरून रामकृष्ण मंगल कार्यालयाहून काटे पुरम चौकाच्या दिशेने जात होता. भरधाव दुचाकी असताना ही शैलेश फोनवर बोलत होता. उजव्या हातात दुचाकीच हँडल तर दुसऱ्या हातात मोबाईल, तो कोणाशी तरी बोलत होता. तेवढ्यात बॅडमिंटन च्या समोर असलेल्या स्पीड ब्रेकर च्या पट्ट्यावरून तो थेट भरधाव स्कुलबसच्या चाकाखाली गेला. यात त्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मृत शैलेश ने हेल्मेट वापरले असते तर त्याचा कदाचित जीव वाचला असता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या महिन्यात २६नोव्हेंबर रोजी याच घटनास्थळी निरंजन अनिल हिरवे या १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं काटे पुरमच्या बॅडमिंटन हॉलच्या समोर गतिरोधक लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.