पुणे : कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरात सातत्याने होत असलेले अपघात रोखण्यासाठी खासगी संस्थेने सुचविलेल्या तात्पुरत्या उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे. नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजनांचा अहवाल खासगी संस्थेकडून लवकरच प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपघात टाळण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना अमलात आणण्यात येणार आहेत. त्याकरिता एका स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात आले आहे. या संस्थेने सुचविलेल्या तात्पुरत्या उपाययोजना तातडीने हाती घेण्यात आल्या होत्या. याबाबत बोलताना विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी तात्पुरत्या उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कात्रज बोगदा ते नवले पूल या सात किलोमीटरच्या परिसरात जड वाहनांसाठी उजव्या बाजूची स्वतंत्र मार्गिका निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुणे-मुंबई दरम्यान पुन्हा थेट विमानसेवा; लोहगाव विमानतळ प्रशासनाकडून हालचाली सुरू

या ठिकाणी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा विविध भाषांतील मोठे माहिती फलक लावण्यात आले आहेत. वेगाला अडथळा आणण्यासाठी या सात कि.मीमध्ये जास्त उंचीचे रम्बल स्ट्रीप बसविण्यात आले आहेत. बोगद्यापासून नवले पुलापर्यंत जड वाहने न्यूट्रल करू नयेत, यासाठी सूचना देण्यात येत आहेत. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीडगन लावण्यात आली आहे.’ दरम्यान, महापालिकेकडून या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. महामार्गांचे सेवा रस्ते मोकळे करण्यात आल्याने सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे. या ठिकाणी अतिक्रमणे होऊ नये, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत, असेही विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.

अपघात कमी होण्याचा दावा

नवले पूल परिसरात नोव्हेंबर महिन्यात भीषण अपघात झाला होता. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक बोलावली होती. नवले पुलावर जास्त उतार असल्याने अपघात होत आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे, तर हा उतार योग्य असल्याचे एनएचएआयचे म्हणणे आहे. या दोन्ही यंत्रणांत मतभेद आहेत. मात्र, नवले पूल पाडणे हा त्यावरचा उपाय नाही, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले असून या उपाययोजनांमुळे या ठिकाणचे अपघात कमी होण्याचा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accidents near navale bridge will be prevented separate lane heavy vehicles speedgun pune print news psg 17 ysh