अपघातप्रवण ठिकाणांची संख्याही १७० वरून ८४ इतकी कमी
पुणे : पुणे विभागांतर्गत असलेल्या मुंबई-बंगळुरू, पुणे-सोलापूर, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि पुणे-सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅक स्पाॅट) होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी केलेल्या उपाययोजना काही प्रमाणात यश आले आहे. सन २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये अपघातांंचे प्रमाण घटले असून, अपघातप्रवण ठिकाणांंची संख्याही १७० वरून ८४ इतकी कमी झाली आहे.
महामार्गांवर अपघातांंचे प्रमाण वाढल्यामुळे महामार्ग पोलिसांनी अपघातप्रवण ठिकाणे निश्चित केली. संबंधित १७० ठिकाणी अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. या ठिकाणांंचे सुरक्षात्मक लेखापरीक्षण करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण, वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी रम्बल स्ट्रिप आणि परिवर्तक पट्ट्या (ब्लिंकर) लावण्यात आल्या.
या ठिकाणी वाहतूक पोलिसांची गस्त वाढविण्यात आली. त्यामुळे अपघातप्रवण ठिकाणेही कमी झाली आहेत. अशी आता ८४ ठिकाणेच राहिली आहेत. या उपाययोजनांमुळे गंभीर अपघात ५.१५ टक्क्यांनी, तर प्राणांतिक अपघात १३ टक्क्यांनी घटले असल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.
मुंबई-बंगळुरू, पुणे-सोलापूर, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि पुणे-सोलापूर-हैदराबाद या महामार्गांवर २०२३ मध्ये दोन हजार १९० अपघात होऊन १,१९१ जणांंना जीव गमवावा लागला होता. महामार्ग पोलिसांच्या उपाययोजनांमुळे २०२४ मध्ये दोन हजार ७७ अपघात होऊन १,०३५ जण मृत्युमुखी पडले.
अपघाताची कारणे
– मर्यादेपेक्षा जास्त वेगाने प्रवास
– सीटबेल्ट न लावता किंवा विनाहेल्मेट वाहन चालविणे
– मद्य प्राशन करून वाहन चालवणे
– उलट दिशेने प्रवास
– चुकीच्या पद्धतीने ‘ओव्हरटेक’ करणे
– असक्षम वाहनांचा वापर करणे
अपघातप्रवण ठिकाणी केलेले उपाय
– या ठिकाणांचे सुरक्षात्मक लेखापरीक्षण
– रस्त्यांचे रुंदीकरण
– ठिकठिकाणी रम्बल स्ट्रिप आणि परिवर्तक पट्ट्या
– वाहतूक पोलिसांची सातत्याने गस्त
– महामार्गांलगतच्या रुग्णालयांमध्ये प्रथमोपचाराची सुविधा
– वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एचटीएमएस’ प्रणालीचा अवलंब
अपघातांचे प्रमाण
वर्ष – अपघात – मृत्यू
२०२३ – २,१९० – १,१९१
२०२४ – २,०७७ – १,०३५
सातत्याने अपघात होणाऱ्या ठिकाणांचे सुरक्षात्मक लेखापरीक्षण केल्यामुळे उपाययोजना करता आल्या. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकले आहे. – विक्रांत देशमुख, महामार्ग पोलीस अधीक्षक