एसटीच्या सर्व मार्गावरील बसच्या तिकिटांवर अधिभार (अपघात सहायता निधी) लावून वर्षांला दोनशे कोटी रुपये वसुलीचे नियोजन करताना राज्य परिवहन महामंडळाकडून पंचवीस हजार अपघातांचे अजब नियोजन करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एसटीचा हा दरवाढीचा प्रस्ताव तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.
सजग नागरी मंचचे जुगल राठी, विवेक वेलणकर, संजय शितोळे यांनी याबाबत मुख्यमंत्री व राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षांना निवेदन पाठविले आहे. एसटीच्या वतीने दिवाळीच्या सुटीमध्ये प्रवाशांवर दरवाढ लादण्यात आली होती. त्यानंतर आता १ एप्रिलपासून सर्व तिकिटांवर अधिभार (अपघात सहायता निधी) लावण्यात येणार आहे. त्यातून दोनशे कोटी रुपये वसुलीचे नियोजन आहे. याबाबत राठी यांनी अक्षेप घेतले आहेत. राठी म्हणाले, की संबंधित रकमेतून अपघातग्रस्तांना वाढीव नुकसान भरपाई दिले जाणार असल्याचे सांगितले जाते आहे. सध्या मृत प्रवाशाच्या वारसाला तीन लाख रुपये, तर जखमींना ३० ते ५० हजारांची भरापाई दिली जाते. सध्या किती अपघात होतात व वर्षांला किती नुकसान भरपाई दिली जाते, याची कुठलीही माहिती जाहीर न करता दोनशे कोटी रुपयांचा बोजा प्रवाशांवर लादणे म्हणजे ढिसाळ कारभाराची व असुरक्षित प्रवासामुळे पंचवीस हजार अपघातांचे नियोजन करीत असल्याची कबुलीच देण्याचा प्रकार आहे.
वाढीव नुकसान भरपाईनुसार प्रत्येक मृत प्रवाशाच्या वारसाला दहा लाख या प्रमाणे अंदाजे दोन हजार प्रवाशांच्या जीवाची किंमत प्रवाशांकडून वसूल करण्याची म्हणजेच अपघात घडविण्याचे अजब व अमानवीय नियोजनच महामंडळाकडून होत असल्याचा आरोप राठी यांनी केला आहे. या प्रकरणात कोणतीही माहिती पारदर्शी नाही. दोनशे कोटी वसुली करून अपघात सहायतेसाठी दहा ते २० कोटी, तर इतर रक्कम उर्वरित ठिकाणी वळविली जाण्याची शंका आहे. त्यामुळे संबंधित दरवाढीचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी राठी यांनी दिलेल्या पत्रात केली आहे.

Story img Loader