अवैधरीत्या लोहमार्ग ओलांडणे, रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचा वापर न करणे, मोबाईल हेडफोन लावून लोहमार्गावरून चालणे.. आदी गोष्टींमुळे रेल्वेच्या पुणे विभागात व विशेषत: पुणे- लोणावळा दरम्यान लोहमार्गावर होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. पाच वर्षांपूर्वी पुणे विभागात संपूर्ण वर्षभरात सुमारे अडीचशे नागरिकांचा लोहमार्गावर मृत्यू झाला होता. मागील वर्षांमध्ये ही संख्या जवळपास चारशेच्या घरात गेली आहे. त्यात आत्महत्या करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.
रेल्वेच्या पुणे विभागाच्या पुणे- लोणावळा पट्टय़ामध्ये लोहमार्गालगत अनेक ठिकाणी नागरी वस्त्या आहेत. या वस्त्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शिवाजीनगरपासून देहूरोडपर्यंत लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती आहे. एका भागाकडून दुसरीकडे जाण्यासाठी लोहमार्ग ओलांडला जातो. त्यात अनेकदा अपघात होतात. रेल्वे स्थानकात एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी पादचारी पुलांची व्यवस्था असली, तरी बहुतांश वेळेला ‘शॉर्टकट’च्या फंदात थेट लोहमार्ग ओलांडला जातो. त्यातही अनेकांचे बळी जातात. अलीकडच्या काळात मोबाईलच्या हेडफोनमुळेही काहींना जीव गमवावा लागला आहे. कानाला हेडफोन लावून लोहमार्ग ओलांडत असताना गाडीचा आवाज ऐकू न आल्याने रेल्वेचा धक्का लागण्याच्या घटनाही घडत असल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात.
अनधिकृतपणे व धोकादायक पद्धतीने लोहमार्ग ओलांडण्याच्या प्रकारातून पुणे विभागात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असताना लोहमार्गावर रेल्वेखाली आत्महत्या करण्याचे प्रकारही वाढले आहेत. रेल्वेच्या धडकेने मृत्यू पावणाऱ्यांमध्ये सुमारे ४० टक्के आत्महत्या असल्याचे स्पष्ट होत आहे. ही आकडेवारी लक्षात घेता पुणे विभागामध्ये दर महिन्याला सुमारे १५ नागरिक रेल्वेखाली आत्महत्या करीत असल्याचे दिसून येते. िपपरी, चिंचवड व आकुर्डी स्थानकालगतच्या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात आत्महत्या होतात. मावळमध्ये वडगाव व कामशेत या परिसरातही रेल्वेखाली आत्महत्येच्या घटना सातत्याने घडतात.
२००८-२००९ या वर्षांमध्ये पुणे विभागात लोहमार्गावर २६२ जणांचा मृत्यू झाला होता. ही संख्या प्रत्येक वर्षी वाढत गेली. दोन वर्षांपूर्वी ही संख्या ३८० झाली, तर मागील वर्षी चारशेच्या आसपास नागरिकांचा लोहमार्गावरील अपघातात मृत्यू झाला. लोहमार्गावरील अपघात किंवा आत्महत्येमुळे रेल्वेच्या वाहतुकीकही अडथळा येत असल्याने लोहमार्गावरील मृत्यू रेल्वेसाठी डोकेदुखी ठरते आहे. हे प्रकार थांबविण्याच्या दृष्टीने गाडय़ांच्या चालकांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात स्थानकालगतच्या भागात त्याचप्रमाणे लोहमार्गालगत लोकवस्ती असलेल्या भागातही गाडीचा हॉर्न वाजविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अवैधरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्यांच्या विरुद्ध रेल्वेकडून मोहीमही उघडण्यात आली आहे.
लोहमार्गावरील मृत्यू वाढले
अवैधरीत्या लोहमार्ग ओलांडणे, रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचा वापर न करणे, मोबाईल हेडफोन लावून लोहमार्गावरून चालणे.. आदी गोष्टींमुळे लोहमार्गावर होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-02-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accidents seucides increased on rly track