नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांनी मनसोक्त फिरण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) राज्यातील सर्व निवासस्थांमधील खोल्या ९० टक्के आरक्षित झाल्या आहेत. पुणे, औरंगाबाद, कोकण अशा विविध विभागातील महामंडळाच्या निवासस्थानांना पर्यटकांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे.
हेही वाचा >>>पुणे: ‘पीएमआरडीए’कडून बांधकाम परवानगीचे विकेंद्रीकरण; क्षेत्रफळनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी
नाताळ सणानिमित्त शाळांना सुट्या असतात. याशिवाय सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्याचे अनेकांचे नियोजन असते. विशेषतः निसर्गरम्य ठिकाणी जाऊन उत्साही वातावरणात कुटुंबीयांसमवेत आनंद साजरा करण्यावर भर असतो. पर्यटन महामंडळाची बहुतांश निवासस्थाने निसर्गरम्य ठिकाणी आहेत. तसेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदा करोनाबाबत कोणतेच निर्बंध नसल्याने मोकळ्या वातावरणात आनंद साजरा करण्यासाठी पर्यटकांनी निवास्थानांमधील खोल्यांचे आरक्षण केले आहे. यंदा पाऊस चांगला झाला असल्याने घाटमाथ्यावरील निसर्गरम्य ठिकाणी धबधबे ओसंडून वाहत आहेत. पाऊस संपून थंडीची चाहूल लागल्याने पर्यटकांची पावले आपसुकच पर्यटनाकडे वळत आहेत. पुणे विभागात कार्ले, भाजे, तारकर्ली, हरिहरेश्वर, दापोली, महाबळेश्वर, पानशेत, भीमाशंकर, माळशेज, नाणेघाट अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने तारकर्ली येथील समुद्रकिनारा, महाबळेश्वर, वाई, पाचगणी या ठिकाणांना पर्यटकांकडून सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा >>>पुणे: एकविरा देवी गडावर रज्जू मार्ग ; महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ प्रकल्प उभारणार
याबाबत बोलताना पर्यटन महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक मौसमी कोसे म्हणाल्या, ‘नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी महामंडळाच्या निवासस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात आरक्षण केले आहे. राज्यभरातील निवासस्थानांत आतापर्यंत ८५ ते ९० टक्के आरक्षण झाले आहे. औरंगाबाद, कोयना, महाबळेश्वर, कार्ला, पानशेत आदी निवासस्थानांत बहुतांश पूर्ण क्षमतेने आरक्षण झाले आहे, तर माळशेज, भीमाशंकर यांसह कोकण विभागातील तारकर्ली, दापोली, वेळणेश्वर, गणपती पुळे, कुणकेश्वर, हरिहरेश्वर आदी निवासस्थाने ७५ ते ८० टक्के आरक्षित झाली आहेत.’
दरम्यान, नाताळ आणि नववर्षानिमित्त महामंडळाच्या निवासस्थानांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच नववर्ष स्वागताची तयारी करण्यात आली असून पर्यटकांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महामंडळाच्या निवासस्थानांचे आरक्षण करण्यासाठी MTDC.Co या संकेतस्थळावर आरक्षण करावे. संकेतस्थळावर संबंधित पर्यटनस्थळ आणि निवासस्थानाबाबत माहिती देण्यात आली आहे, असेही कोसे यांनी सांगितले.