साखर उद्योगात संशोधन करण्यासाठी गुंतवणूक आवश्यक आहे. तशी मानसिकता निर्णय घेणाऱ्यांमध्ये असावी आणि अर्थसंकल्पातही त्यासाठी तरतूद करण्यात यावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केली. साखर उत्पादनात जागतिक क्रमवारातील देश अग्रसेर असून राज्य देशाच्या पातळीवर अव्वल स्थानी आहे. मात्र इथेनॉल निर्मितीकडेही साखर उद्योगाला लक्ष द्यावे लागणार आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.
हेही वाचा >>> स्वच्छता मोहीम राबवताना पर्यावरण संवर्धनालाही तितकेच महत्व दिले पाहिजे’ ; सयाजी शिंदे
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या (डीएसटीए) वतीने ६७ व्या वार्षिक दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील, कानपूर येथील राष्ट्रीय साखर संस्थेेचे संचालक नरेंद्र मोहन, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, डीएसटीएचे अध्यक्ष श्रीपाद गंगावती, राज्य उपाध्यक्ष एस. बी. भड, डीएसटीए कर्नाटक उपाध्यक्ष सोहन शिरगावकर, कल्लाप्पाण्णा आवाडे यावेळी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, साखर निर्मिती उद्योगामध्ये संशोधन आणि तंत्रज्ञानाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून त्याचा उपयोग या उद्योग प्रक्रियेतील प्रत्येक छोट्या घटकाला होणे आवश्यक आहे. साखर उद्योगाला पाऊस, दुष्काळ, पूर, कीड, भारनियमन, हमीभाव अशा प्रत्येक संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे तरूण पिढीने यावर उपयुक्त असे संशोधन करावे.कृषी उत्पादनात साखर निर्यातीत महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या आपल्या देशाने पर्यावरणाच्या दृष्टीने देखील योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. प्रदूषणाचा वाढता विळखा लक्षात घेऊन इथेनॉल निर्मिती प्रकल्पांना देखील अधिक चालना दिली पाहिजे.यंदा जागतिक पातळीवरील साखर निर्मितीत पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून भारताने स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत भारत पहिल्या स्थानावर असून ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. जागतिक पातळीवरील देशांच्या क्रमवारीत चीन, रशिया, थायलंड या देशांना मागे टाकून एखाद्या देशातील राज्याने स्थान मिळवण्याचा इतिहास महाराष्ट्राने रचला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ४२ हजार ६०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. एकही रुपया अनुदान न देता देशातून एकशे बारा लाख टन साखर यावर्षी निर्यात झाली आणि त्यापैकी ७५ लाख टन साखर ही महाराष्ट्रातून निर्यात झाली आहे, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पुणे : सिंहगडावर सहलीसाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवकाचा बुडून मृत्यू
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक डीएसटीए अध्यक्ष श्रीपाद गंगावती यांनी केले. नरेंद्र मोहन आणि सोहन शिरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. डीएसटीए महाराष्ट्राचे उपाध्यक्ष एस. बी. भड यांनी आभार मानले.
साखर कारखान्यांना पुरस्कार
डॉ. एस. एम. पवार, एन. व्ही. थेटे, सी. जी. माने, डॉ. डी. एम. रासकर, ओ. बी. सरदेशपांडे आणि सी. एन. देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गुजरात येथील गणदेवी साखर खांड उद्योग लि., कर्नाटकमधील उगार शुगर वर्क्स लि. आणि महाराष्ट्रातील जवाहर सहकारी साखर कारखाना लि. या तीन साखर कारखान्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आले. प्रभाकर कोरे, मोहनराव कदम, जयंत पाटील, नवीनभाई पटेल आणि प्रशांत परिचारक यांना यंदाचा साखर उदयोग गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कृषी आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील शोधनिबंधांसाठीची आणि उत्पादनासाठीची पारितोषिकेही देण्यात आली.