पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणातील आरोपींविरुद्ध पुणे पोलिसांनी तीन पानी गोपनीय अहवाल सोमवारी न्यायालयात दाखल केला. ललितसह साथीदारांचे परदेशातील बड्या अमली पदार्थ तस्करांशी संबंध असल्याचे पोलिसांनी अहवालात म्हटले आहे. ससून रुग्णालयातून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ललित पाटीलसह चौदा साथीदारांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.

अमली पदार्थ तस्करी प्रकरणात ललितच्या आणखी चार साथीदारांची नावे तपासात निष्पन्न झाल्यानंतर आरोपी इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान आाणि हरिश्चंद्र पंत यांना अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (२० नाेव्हेंबरपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. खान आणि पंत यांच्यासह अकरा आराेपींची पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर पोलिसांनी ललितसह सुभाष मंडल, रौफ शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, रेहान ऊर्फ गोलू अन्सारी, अरविंदकुमार लोहरे, प्रज्ञा कांबळे, जिशान शेख, शिवाजी शिंदे, राहुल पंडित यांना न्यायालयात हजर केले.

हेही वाचा – पुणे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी घोषित

पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात अनेक बाबी उघडकीस आल्या आहेत. आरोपींचे परदेशातील बड्या अमली पदार्थ तस्करांशी संबंध असल्याचा संशय आहे. मेफेड्रोनची निर्मिती, साठवणूक, वितरण कशा पद्धतीने करण्यात आले, याबाबतची माहिती तपासात मिळाली आहे. आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग उघड झाला आहे. अमली पदार्थनिर्मिती आणि तस्करीप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील ॲड. विलास पठारे यांनी युक्तिवादात केली.

आरोपींकडून दोन कोटी १४ लाख ३० हजार रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थ विक्रीतून आरोपींनी खरेदी केलेला आठ किलो सोन्याची बिस्किटे, महागड्या मोटारी, मोबाइल संच असा पाच कोटी ११ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. पोलीस कोठडी मिळवण्यासाठी दिलेली कारणे जुनी आहेत. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केली.

हेही वाचा – धक्कादायक…येरवडा कारागृहातून कैद्याचे पलायन

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी ललित पाटीलसह साथीदार अरविंद लोहरे, भूषण पाटील, जिशान शेख, राहुल पंडित, इम्रान शेख, शिवाजी शिंदे, हरिश पंत यांच्या पोलीस कोठडीत २४ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला. आरोपी सुभाष मंडल, रौफ शेख, अभिषेक बलकवडे, रेहान अन्सारी, प्रज्ञा कांबळे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश दिला.

Story img Loader