नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरू केली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत साडेचार लाख विद्यार्थ्यांनी ‘ॲकॅडमिक क्रेडिट बँक’साठी नोंदणी केल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी दिली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर विद्यापीठ, महाविद्यालय पातळीवरील समन्वयक अधिकारी, संशोधक समन्वयक, प्राध्यापक यांच्यासाठी कार्यशाळा झाली. त्यावेळी डॉ. सोनावणे बोलत होते. माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, राहुल पाखरे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले आदी या वेळी उपस्थित होते. सुमारे दोनशे महाविद्यालयांच्या प्रतिनिधींनी कार्यशाळेत सहभाग घेतला.
हेही वाचा >>>पुणे: एक हजार केंद्रांवर ‘सीयूईटी’; १ ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष
डॉ. सोनवणे म्हणाले, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घेऊन महाविद्यालयांनी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. धोरण समजून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्व सोयी सुविधा दिल्या जातील. मात्र योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे महाविद्यालयांच्याच हाती आहे. कोणतीही अडचण आली तर ती सोडवण्यासाठी विद्यापीठाकडून सहकार्य केले जाईल.विद्यापीठाने शैक्षणिक धोरणाबाबत नेमलेल्या समितीने महाविद्यालयांपर्यंत धोरण पोहोचवणे, प्रशासकीय बदल करणे आणि शासनाशी समन्वय साधण्याबाबत अनेक मार्गदर्शक सूचना दिल्याचे डॉ. ढोले यांनी सांगितले.