पुणे : देशातील विविध ठिकाणच्या हवामान क्षेत्रांतील वैविध्य, अजूनही काही प्रमाणात अपुरे पडणारे तंत्रज्ञान, प्रारूपांमधील त्रुटी आणि माहितीचे विश्लेषण करताना राहत असलेल्या मानवी त्रुटी यांमुळे पावसाचा १०० टक्के अचूक अंदाज बांधणे अशक्य आहे. तरीही भारतीय हवामान विभागाच्या अंदाजांची अचूकता आता ८५ टक्क्यांवर गेली आहे, असे मत हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज देऊनही राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हुलकावणी दिल्याचे दिसले. इशारा दिलेल्या भागांत ऊन असेही चित्र काही ठिकाणी होते. त्यामुळे हवामान विभागाच्या पावसाच्या अंदाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यावर, हवामान शास्त्रज्ञांनी पावसाच्या अंदाजाबाबत उपलब्ध साधने आणि मर्यादा यावर भाष्य केले.

हेही वाचा >>> ज्येष्ठ अधिका-यांना डावलून दोन उपअभियंत्यांवर ‘भार’ पिंपरी महापालिका आयुक्तांचा निर्णय वादात

पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा संस्थेच्या प्रमुख डॉ. मेधा खोले म्हणाल्या, ‘भारत उष्णकटिबंधीय देश आहे. त्यामुळे देशात वेगवेगळी हवामान क्षेत्रे (क्लायमेट झोन) आहेत. तसेच हवामान विभागाकडून अंदाज जाहीर करताना नऊ प्रमुख प्रारूपांचा अभ्यास करून सारांश काढून अंदाज दिला जातो. प्रत्येक प्रारूपामध्ये काही त्रुटी आहेत. प्रामुख्याने मुंबई, कोलकाता, चेन्नईसारख्या किनारपट्टीवरील मोठ्या शहरांचे इशारे चुकीचे ठरू नयेत, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज चुकू नये, यासाठी अधिक काळजी घेतली जाते. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असला, तरीही अनेकदा मुसळधार पावसाचा अंदाज दिला जातो. यामागे प्रशासन, आपत्ती निवारण यंत्रणा दक्ष राहावी, असा उद्देश असतो. त्यामुळे अनेकदा अंदाजात त्रुटी राहतात. पण, गेल्या काही वर्षांपासून हवामानाच्या अंदाजांमध्ये ८५ टक्के अचूकता आली आहे, जी पूर्वी ६० ते ६५ टक्के इतकीच होती. डॉप्लर रडारमुळे पुढील तीन ते चार तासांचा अचूक अंदाज देणे शक्य झाले आहे. त्या पुढील काळासाठी विविध प्रारूपांचा आधार घ्यावा लागतो.’

हेही वाचा >>> पुणे: पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात, मेट्रो स्थानकावर प्रवाशाचा मृत्यू

संभ्रम निर्माण होऊ न देण्याची काळजी

हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, ‘मोसमी पावसाच्या हवामानाचा अंदाज व्यक्त करताना बऱ्याचदा सरकारचा दबाव असतो. जनतेमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ नये, याची काळजी घेतली जाते. दोन-तीन दिवस अगोदर अंदाज व्यक्त करण्यात अचूकता आली आहे. पण, मध्यम, दीर्घकालीन अंदाज व्यक्त करण्यात फारशी अचूकता आली नाही. नजीकच्या भविष्यात हवामानाच्या अंदाजात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भौगोलिक माहिती प्रणालीची (जीआयएस) भूमिका महत्त्वाची राहणार आहे. आता मुंबई किंवा पुणे शहरासाठी किंवा संपूर्ण जिल्ह्यांसाठी अंदाज दिला जात आहे. भविष्यात मोठ्या शहरांसाठी उपनगरनिहाय अंदाज देणेही शक्य होईल.’

इशाऱ्यांचे अंदाज कसे दिले जातात?

हवामान विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांबाबत बोलताना डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, ‘समजा मुंबई, पुणे शहराला नारंगी इशारा दिला आणि शहराच्या कोणत्याही एका भागात मुसळधार पाऊस झाला, तर हवामानशास्त्रानुसार तो अंदाज बरोबर आहे. संपूर्ण शहरात किंवा शहराच्या सर्वच भागांत मुसळधार पाऊस व्हावा किंवा झाला पाहिजे, असे नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर सुरू झाल्यानंतर अंदाजात अधिक अचूकता येईल.’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accurate rainfall forecast not possible due to diversity of climate inadequate technology and human errors pune print news dbj 20 zws