मावळ लोकसभेची उमेदवारी सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांना जाहीर झाल्यानंतर संतापलेल्या खासदार गजानन बाबर यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर केलेले सर्व आरोप शिवसेनेने बुधवारीफेटाळून लावले. नैराश्य भावनेतून बाबरांनी हे आरोप केले असून तीन वर्षांपूर्वीच आपल्याला पक्षनेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळाला होता, असे बारणे यांनी स्पष्ट केले. तर, ‘मातोश्री’च्या सूचनेनुसार आलेले रायगडचे जिल्हाप्रमुख बबन पाटील यांनी, बाबर गेल्याने शिवसेनेला काही फरक पडणार नसल्याचे सांगत त्यांना शिवसेनेच्या पध्दतीने समजावून सांगितले असल्याचे नमूद केले.
शिवसेनेने मावळ लोकसभेची उमेदवारी पैसे घेऊन विकल्याचा आरोप खासदार बाबरांनी काल पत्रकार परिषदेत केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना उद्देशून त्यांनी केलेले आरोप बारणे व पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन फेटाळले. यावेळी जिल्हाप्रमुख मच्िंछद्र दराडे, बाबा धुमाळ, उपजिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर, चिंचवड शहरप्रमुख राहुल कलाटे, नगरसेविका सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.
बारणे म्हणाले, गेल्यावेळी इच्छुक होतो, तेव्हाच पुढील वेळी विचार करू, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला होता. तिकीट विकल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. बाबरांचे आरोप नैराश्यभावनेतून झाले आहेत. ठाकरे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून आपण निवडून येणार आहोत, असे बारणे यांनी स्पष्ट केले.
‘शेकाप-मनसेचा फरक पडणार नाही’
शेकापने कोणालाही पािठबा दिला तरी फरक पडणार नाही. पण, ते आमच्यासोबच राहतील. त्यादृष्टीने आमदार विवेक पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेशी युती ठेवा, असा शेकाप कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, असे बबन पाटील यांनी सांगितले. शिवसेनेतून गजानन बाबर बाहेर गेल्याने फरक पडणार नाही. सेनेत राहिलेल्या बाबर समर्थकांना पक्षाचे काम करावे लागेल, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करू. मनसेचे काही राहिले नाही, त्यांची ताकदही नाही. मनसेने काही भूमिका घेतली तरी आम्हाला फरक पडणार नाही.