दहा वर्षे वयाच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या संशयावरून अटक केलेल्या आरोपीला गुरुवारी शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात संतप्त महिलांना सामोरे जावे लागले. पोलीस व काही वकिलांनी हस्तक्षेप केल्यामुळे हा आरोपी महिलांकडून होणाऱ्या मारहाणीपासून बचावला. एका महिलेने भिरकावलेल्या चपलेचा फटका मात्र त्याला खावा लागला.
राजेंद्र भीमा आसुदेव (वय ३१, रा. डायसप्लॉट झोपडपट्टी) असे या आरोपीचे नाव आहे. तो राहत असलेल्या झोपडपट्टीतील एका दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी त्याला २२ मार्चला अटक केली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला न्यायालयात घेऊन येण्याच्या अगोदरच डायस फ्लॉट झोपडपट्टीतील तीस ते चाळीस महिला न्यायालयात जमल्या होत्या. पोलीस त्याला घेऊन आले असता, महिलांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला तातडीने जुन्या इमारतीमधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भिलारे यांच्या न्यायालयात आणून दरवाजे बंद केले. दरवाजा बंद करीत असताना एका महिलेने भिरकाविलेल्या चपलेचा फटका मात्र त्याला लागला.
न्यायालयाच्या आवारातच या आरोपीच्या विरोधात महिलांनी घोषणाही दिल्या. हा गोधळ पाहून मुख्य जिल्हा न्यायाधीश अनंत बदर हेही बाहेर आले. महिला पोलीस व बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष बिपिन पाटोळे यांच्यासह अन्य वकिलांनी महिलांना शांत करीत न्यायालयाच्या बाहेर काढले.
आसुदेव याच्यावर लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
न्यायालयाच्या आवारात जमलेल्या डायसप्लॉट झोपडपट्टीत राहणाऱ्या महिला मोलकरणीचे काम करणाऱ्या होत्या. कामासाठी घराबाहेर पडल्यानंतर मुलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. संबंधित आरोपीला जामीन देऊ नये व त्याच्यावर बलात्काराचे कलम लावावे, अशा मागण्या त्यांनी केल्या.