पुणे : बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर सामुहिक बलात्कार प्रकरणात गेले सहा महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला वालचंदनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. वालचंदनगर पोलीस आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला रात्री उशीरा पुण्यात आणण्यात आले.
सूरज उर्फ बापू गोसावी (रा. भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बोपदेव घाट प्रकरणात यापूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) आणि अख्तर अली शेख (२८, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांना अटक केली होती. बोपदेव घाटात ३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री महाविद्यालयीन तरुणी मित्रासोबत फिरायला गेली होती. बोपदेव घाटातील टेबल पाॅईंट परिसरात तरुणी आणि तिचा मित्र गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपी कनोजिया, शेख आणि गोसावी यांनी तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राला मारहाण केली. दोघांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील चीजवस्तू काढून घेतल्या. त्यानंतर तिघांनी कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली होती.
याबाबत पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पसार झालेले आरोापींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ६० हून जास्त पथके तयार केली होती. धमकावून लुटणे, तसेच बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या ४५० सराइतांची पोलिसांनी चौकशी केली. बोपदेव घाट, सासवड, कोंढवा, येवलेवाडी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, कनोजिया आणि शेख यांना अटक करण्यात आली. शेखला प्रयागराज परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर गोसावी पसार झाला होता. पोलिसांची पथके त्याच्या मागावर होती. गेले सहा महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता.
ओळख लपवून वास्तव्य
गोसावीच्या मागावर पोलिसांची पथके होती. मात्र, तो त्याची ओळख लपवून वास्तव्य करत होता. तो त्याच्या परिचितांशी संपर्कात नव्हता. त्यामुळे पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. गोसावी अकलूज भागातील एसटी स्थानक परिसरातून पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांना शनिवारी दुपारी मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजकुमार डुणगे, हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, सचिन गायकवाड, अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर यांनी ही कारवाई केली. त्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशीरा त्याला पुण्यात आणण्यात आले.
वालचंदनगर पाेलिसांच्या पथकाने बोपदेव घाट प्रकरणातील फरार आरोपीला शनिवारी पकडले. त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, याप्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. – निखील पिंगळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा