पुण्यात तोतया पत्रकाराने लष्कर भागातील पूलगेट चौकीत गोंधळ घालून कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धमकावले. या प्रकरणी आरोपी तोतया पत्रकारास लष्कर पोलिसांकडून अटक करण्यात आली. अकबर पीरसाहब शेख (वय ३७, रा. पानसरेनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलीस कर्मचारी संतोष बनसुडे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शेखने वादातून बालगोपी बलगाणी (वय ३२, रा. सोलापूर रस्ता) याला मारहाण केली. त्यानंतर बलगाणी पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आला. तेव्हा पाठोपाठ शेख तेथे आला. पोलीस चौकीतील कर्मचारी बनसुडे यांना त्याने धमकावण्यास सुरुवात केली.
‘मी मदत फाऊंडेशनचा अध्यक्ष असून पत्रकार आहे,’ असे आरोपी शेखने पोलीस कर्मचारी बनसुडे यांना सांगितले. ’माझ्यावर कारवाई केलीत, तर मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करीन. माझ्या विरोधात तक्रार घेतल्यास मी दाखवतो कोण आहे ते’, अशी धमकी देऊन आरोपी शेखने पोलीस चौकीत गोंधळ घातला.
हेही वाचा : पुणे : रिक्षाचालकाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन चोरट्यांनी लांबवली ५४ हजारांची सोनसाखळी
सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी शेखला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर पवार तपास करत आहेत.