पुणे : Darshana Pawar murder case राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिची हत्या तिचा मित्र सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे यानेच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकातून बुधवारी रात्री ताब्यात घेतले. लग्नाला नकार दिल्याने दर्शनाची हत्या केल्याची कबुली राहुलने दिली आहे.

१८ जून रोजी राजगड किल्ल्याच्या पायथ्याला दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. दर्शना आणि राहुल १२ जून रोजी सकाळी साडेआठला राजगड किल्ल्यावर गेले होते. सकाळी पावणेअकराला राहुल गडावरून एकटाच खाली आल्याचे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या उपाहारगृहाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून स्पष्ट झाल्याने त्याचा शोध घेण्यात येत होता. राहुलला बुधवारी रात्री अंधेरी स्थानक येथून ताब्यात घेण्यात आले असून, दर्शनाने लग्नास नकार दिल्याने तिची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दर्शनाची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झाली होती. एका संस्थेतर्फे आयोजित सत्काराच्या कार्यक्रमासाठी ती ९ जूनला पुण्यात आली होती. नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. १२ जूनला सिंहगडावर जायचे आहे, असे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. तिने कुटुंबीयांनाही तसे कळवले होते. तिचा मोबाइल बंद असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने त्यांनी शोध सुरू केला. ठावठिकाणा न लागल्याने दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. दर्शनाचा मृतदेह आढळल्याने वेल्हे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जुनी मैत्री, लग्नासाठी तगादा..

दर्शनाच्या मामाच्या घराजवळ राहुलचे घर असल्याने या दोघांची जुनी मैत्री होती. दर्शनाने एमएस्सी (मॅथ्स) आणि राहुलने बीएस्सीपर्यंतचे (बॉटनी) शिक्षण घेतले होते. दोघेही स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होते. अन्नपदार्थाची घरपोच सेवा देणारी अर्धवेळ नोकरी राहुल करीत होता. दर्शना परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तो लग्नासाठी तिच्या मागे लागला होता.